
Amazon Prime वर मोहनलाल यांची प्रमुख भूमिका असलेला दृश्यम-2 नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. पहिल्या भागाइतकाच किंबहुना त्याहूनही जास्त उत्कंठावर्धक असल्याने या मल्याळम चित्रपटाची सर्वत्र जबरदस्त चर्चा सुरू आहे. सबटायटल्ससकट हा चित्रपट उपलब्ध असल्याने ज्यांना मल्याळम कळत नाही अशा लोकांनीही हा चित्रपट मोठ्या प्रमाणावर पाहिला आहे. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहिल्यानंतर त्याची हिंदी आवृत्तीही तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दृश्यम हिंदी चित्रपटामध्ये मोहनलाल यांनी केलेली भूमिका अजय देवगणने साकारली होती. तब्बू या हिंदी चित्रपटामध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये होती तर श्रिया सरण ही अजय देवगणच्या बायकोच्या भूमिकेत होती.
दृश्यम-2 या हिंदी चित्रपटामध्येही अजय देवगण आणि तब्बू हे पुन्हा एकत्र येणार आहेत. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये म्हटलंय की हा चित्रपट हिंदीत बनविण्यासाठी मूळ चित्रपटाच्या निर्मात्याकडून हक्क मिळवण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या शेवटाला चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल आणि 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल असं सांगितलं जात आहे.























































