
गाढवाचे मांस खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो असा समज असल्याने देशातील काही भागांमध्ये गाढवाच्या मांसाला मोठी मागणी आहे. या कारणामुळेही गाढवांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र हिंदुस्थानी खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) सांगण्यानुसार गाढवाचे मांस हे खाण्यासाठी वापरू शकत नाही. गाढवाचे मांस खाणे कायद्यानुसार चुकीचे आहे. याचसंदर्भात आता आंध्र प्रदेशमध्ये तपास सुरू असल्याचे वृत्त आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिले आहे. आंध्रमधील काही ठिकाणी गाढवाचे मांस खाल्ल्याने कंबरदुखी, अस्थमा आणि श्वसनाच्या आजारासंदर्भातील व्याधींपासून आराम मिळतो असा समज आहे. तसेच लैंगिक शक्ती वाढवण्यासाठीही गाढवाचे मांस फायद्याचे असल्याचे समजले जाते. गाढवाचे मांस कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यांमध्ये खाल्ले जाते. दर गुरुवारी आणि रविवारी येथे गाढवाच्या मांसाची मोठ्या प्रमाणात विक्री होते. अनेक सुशिक्षित नागरिकही हे मांस विकत घेताना दिसतात. या मांसासाठी आठवड्याला 100 हून अधिक गाढवांना ठार केले जाते, अशी माहिती प्राणीमित्र म्हणून काम करणाऱ्या गोपाल आर. सुरबथुला यांनी दिली आहे.


























































