
शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बी. आर. पाटील यांच्या दालनातच पूर्व वैमनस्यातून एकावर आज (साेमवार) दुपारी एकच्या सुमारास हल्ला झाला. हल्ला करणाऱ्याला पोलिस निरिक्षक पाटील यांनी त्वरीत जागीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला. लखन भागवत माने (40 रा. हजारमाची) असे चाकू हल्ला करणाराचे नाव आहे. किशोर पांडूरंग शिखरे (27 हाजारमाची) असे जखमीचे नाव आहे.
अवघ्या काही सेकंदात झालेल्या घटनेत मानेने केलेले तीन वर्मी वार शिखरे यांच्या पाठ, पोटात व हातावर झाले आहेत. कराड येथील उपजिल्हा रूग्णालयात जखमेवर उपचार सुरू आहेत.
लखन माने व किशोर शिखरे यांच्यात पूर्वी पासून वाद आहे. वादाच्या कारणावरून शिखेरला घाबरून माने पंढरपूर येथे राहण्यास गेला होता. तेथे विठ्ठल मंदीरात येणाऱ्यांना गोपीचंद टिळा लावण्याचे काम करत होता. अलीकडे तो तेथेच स्थायीक होणार होता. तेथे असूनही लखन माने हा किशोर शिखरे याच्या वडीलांशी फोनवर बोलयाचा. त्यांच्याशी संभाषण करू नकोस, असे किशोर नेहमी मानेस सांगायचा. त्यावरून लखनशी त्याचा वादही झाला होता. त्याचा राग मनात धरून मानेने 25 फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता मोबाईलवरुन शिखरेला धमकी दिली होती. तुझा गेम करणार आहे. असे तो शिखरेला म्हणाला होता. शिखरेने त्याची 26 फेब्रुवारीला पोलिसात तक्रार दिली होती. माने पंढरपूरला असल्याने पोलिसांनी त्याला आज (साेमवार) चौकशीला बोलवले होते.
सकाळी अकराच्या सुमारास लखन माने येथील पोलिस ठाण्यात आला. पहिल्यांदा त्याला पोलिस निरिक्षक बी.आर. पाटील यांच्या दालनात नेण्यात आले. पाटील यांनीही दाखल एनसीच्या अनुषंगाने माने याच्याकडे चौकशी केली. त्याचे म्हणणे एकल्यानंतर शिखरे यांना बोलवण्यास तपासी अमंलदारांना सांगितले. त्यानुसार शिखेरही अर्धा तासात तेथे आला. त्यालाही पोलिस निरिक्षक पाटील यांना भेटवले. पाटील यांनी शिखरे याचीही बाजू एेकून घेतली. त्यानंतर त्यांनी मानेला समोर बोलवण्यास सांगितले. मानेला पोलिस घेवून पाटील यांच्या दालनात गेले. त्याचवेळी पोलिसाला हिसका देवून मानेने स्वतःजवळील चाकून थेट शिखरे याच्यावर सपासप वार करण्यास सुरवात केली. शिखरेच्या हात, मान व पाठीत वार झाल्याने तो व्याकूळ होवू पडला. अवघ्या काही सेंकदातील प्रकाराने पोलिस निरिक्षक पाटील हबकले. मात्र क्षणचाही विलंब न करता त्यांनी खुर्चीतून उठून मानेच्या दिशेने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला पुढील वार करण्यापासून थांबवले. दालनात झालेली घाईगडबड कानावर पडताच ठाण्यातील अन्य कर्मचारीही तेथे धावले. त्यावेळी स्थिती अटोक्यात आली. पोलिसांनी मानेला अटक केली आहे.


























































