एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये घुसखोरी झाली होती! राज्याच्या गृहखात्याच्या सायबर सेलचा तपास अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये परदेशी कंपनीने व्हायरस सोडण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. मात्र यामध्ये चीनचा हात आहे का याबाबत तपास करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सायबर सेलच्या अहवालात तीन गंभीर मुद्दे नमूद आहेत ते असे, 14 ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला, 8 जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झाला, ब्लॅकलिस्टेड आयपी अॅड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न.

उर्जामंत्री म्हणतात, हा घातपातच
12 ऑक्टोबर 2020ला मुंबईत बराच वेळ वीजपुरवठा खंडित झाला तेव्हाच मी म्हणालो होतो, यात काहीतरी चुकीचे घडत आहे. त्यावेळी तीन सदस्यांची समिती राज्य सरकारने चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत त्यात तथ्य आहे असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिल्याचे ‘एएनआय’ने म्हटले आहे.

 ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे वृत्त
अमेरिकेतील आघाडीचे दैनिक ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने या सायबर हल्ल्याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. 12 ऑक्टोबरला दहा वाजता मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील  वीजपुरवठा अचानक खंडित झाला. अनेक वर्षांनी ‘पॉवर कट’ होण्याची मुंबईतील पहिलीच घटना होती. कोरोनाकाळात वीज बंद झाल्यामुळे  रुग्णालयांना फटका बसला. शेअर बाजार, लोकल रेल्वेसह अनेक सेवा ठप्प झाल्या. अडीच-तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. यामागे घातपाताची शक्यता व्यक्त होत होती. ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही शक्यता खरी ठरली आहे. ‘पॉवर कट’मागे चीनकडून घातपात होता, अशी माहिती पुढे आली आहे.

‘अमेरिकन कंपनीने काय म्हटले आहे?

  • अमेरिकेतील सायबर सिक्युरिटी कंपनी ‘रेकॉर्डेड फ्युचर’ने मुंबईवर सायबर हल्ल्याचा शोध घेतला आहे. 2009 मध्ये मॅसेच्युसेट्स येथे ही कंपनी स्थापन झाली, अशी माहिती ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दिली आहे.
  • मोठय़ा प्रमाणावर सायबर हल्ला करून मुंबईत गोंधळ उडविण्याचा चीनचा कट होता. मात्र, या सायबर हल्ल्यात अनेक  मालवेअर ऑक्टिव्ह करण्यात आले नव्हते. त्यामुळे थोडय़ा प्रमाणात हा सायबर हल्ला यशस्वी झाला.

चीनच्या ‘रेड इको’कडून मालवेअरची घुसखोरी

  • अमेरिकन ‘रेकॉर्डेड फ्युचर’ कंपनीचे सीईओ स्टुअर्ट सोलेमॉन यांनी चीनने मुंबईत केलेल्या सायबर हल्ल्याबाबत धक्कादायक माहिती उजेडात आणली आहे.
  • ‘रेड इको’ या चिनी कंपनीने हा सायबर हल्ला केला. ही कंपनी चीन सरकार पुरस्कृत आहे.
  • ‘रेड इको’ने हिंदुस्थानातील वीजपुरवठा यंत्रणेवर हल्ला करण्यासाठी मालवेअरची घुसखोरी केली. वीजपुरवठय़ातील दाब आणि मागणीवर नियंत्रण मिळवणाऱया यंत्रणांवर हल्ला करून 10 ठिकाणचे कंट्रोल मिळविण्याचा प्रयत्न केला.
  • मुंबई ही हिंदुस्थानची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करून मोठा गोंधळ माजविण्याचा चीनचा डाव होता. तसेच, चीनच्या ‘रेड इको’ने हिंदुस्थानातील दोन बंदरांच्या यंत्रणांवरही सायबर हल्ला केला.