
सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवत लॉकडाऊनच्या काळात फसवणाऱ्या ठगाविरोधात कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने सुशिक्षित बेरोजगार नोकरीच्या शोधात फिरत आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले आहेत. नोकरीचे आमिष दाखवत सुशिक्षितांना फसवणाऱ्या टोळीचे रॅकेट तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील तरुणांनी उघडकीस आणले आहे.
गेल्या 1 ते 2 महिन्यापासून दीपक दिलीप कसबे (35, रा.दिपेवडगाव ता.केज जि.बीड) याने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना ‘मी गिरीकंद ट्रव्हल्समध्ये मोठ्या पदावर काम करत असून रुग्णवाहिकेवर ड्रायव्हर व वॉर्डबॉयची मोठी भरती करायची आहे. त्याकरिता आपल्याला प्रथम 5 हजार रोख, आधार कार्ड, पॅनकार्ड व ड्रायव्हिंग लायन्सेसची सत्यप्रत द्यावी लागले. त्यानंतर पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये नियुक्त पत्र, ड्रेस, ओळखपत्र देतो असे सांगितले.
या त्याच्या भुलथापांवर विश्वास ठेवत काही तरुणांनी त्याला पैसे दिले आणि पुणे येथे ठरलेल्या तारखेला ससून रुग्णालयात गेले असता या ठगाने नियुक्ती पत्र, ड्रेस, ओळखपत्र देण्याचा एक हॉल दाखवत तेथे बसण्यास सांगितले. त्या ठिकाणी या तरुणांना शंका आली. तेव्हा त्यांनी अधिक चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. काही वेळातच नोकरीचे आमिष दाखविणारा ठग तेथून गायब झाला.
कळंब, बार्शी, दहिफळ, अंबाजोगाई, दिघोळ अंबा, येरमाळा, केज, वाशी येथील तरुणांचा यामध्ये समावेश असल्याने फसवणूक करणारे मोठे रॅकेट असल्याची संशय व्यक्त होत आहे. गायब झालेला ठग हा त्याच्या मूळगावी सापडला. त्याची अधिक चौकशी केली असता प्रश्नांची समर्पक उत्तरे त्याने दिली नाहीत. पुढील चौकशीसाठी त्याला कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. राजेंद्र पांडुरंग बारगुले यांच्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यामध्ये दिपक दिलीप कसबे याच्यावर कलम 420,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक तानाजी दराडे करत आहेत.

























































