ऍसिड हल्ला पीडितेच्या जीवनात नवी पहाट; प्रियकरासोबत बांधली लग्नगाठ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयाच्या 17 व्या वर्षी ऍसिड हल्ल्याची पीडित ठरलेली ओडिशा राज्यातील प्रमोदिनी रोऊल ऊर्फ राणी हिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. सोमवारी प्रमोदिनी प्रियकरासोबत विवाहबद्ध झाली.  हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला दिवस आहे, अशा भावना तिने व्यक्त केल्या. ऍसिड हल्ल्यात प्रमोदिनीचे दोन्ही डोळे गेले आणि शरीर 80 टक्के भाजले होते. त्यानंतर अनंत अडचणींचा सामना करताना तिने हिंमत सोडली नाही. पूर्ण ताकदीनिशी ती उभी राहिली. आता तिच्या आयुष्यात नवी पहाट झाली आहे.

ऍसिड हल्ल्यानंतर प्रमोदिनीवर ज्या रुग्णालयात उपचार सुरू होते तिथेच सरोज शाहू या तरुणाशी तिची भेट झाली. हळूहळू दोघांची चांगली ओळख, मैत्री झाली. या दुर्दैवी प्रसंगातून सावरण्यात सरोजने तिला खूप मदत केली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या संमतीने प्रमोदिनी- सरोजचा विवाह 1 मार्चला झाला.

2009 साली कॉलेजमध्ये जात असताना घडली दुर्दैवी घटना

18 एप्रिल 2009 रोजी प्रमोदिनीवर ऍसिड फेकण्यात आले होते. त्यावेळी ती कॉलेजमध्ये शिकत होती. संतोष वेदांत या जवानाशी  लग्न करण्यास तिने नकार दिला होता. त्या रागातून संतोषने तिच्यावर ऍसिड हल्ला केला. याप्रकरणी प्रमोदिनीच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल केला. मात्र 2012 पर्यंत संतोषविरुद्ध कोणताही पुरावा सापडत नव्हता. कालांतराने हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी प्रमोदिनीची भेट घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर 2017 मध्ये संतोषला अटक झाली.