प्रशासकीय मान्यता असलेली तसेच निविदा प्रक्रिया झालेली एसटी बसस्थानकांची कामे निधीच्या उपलब्धतनेनुसार प्राधान्यक्रम ठरवून पूर्ण केली जातील, असे परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी विधानसभेत सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली व सिरोंचा बसस्थानकांच्या कामांच्या अनुषंगाने सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने ॲड. परब बोलत होते.
अहेरी येथील बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर असून अंतिम टप्प्यात आहे. कोरोना कालावधीत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाल्यामुळे तसेच रेतीघाट बंद असल्यामुळे रेतीअभावी आलापल्ली व सिरोंचा येथील बसस्थानकांची कामे प्रलंबित आहेत. तथापि, अर्थसंकल्पामध्ये बसस्थानकांच्या कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. निधी उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रम ठरवून बसस्थानकांची कामे पूर्ण केली जातील.
नवीन बसस्थानकांच्या कामांसाठी बांधा-वापरा- हस्तांतरित करा (बीओटी) या तत्त्वावर जेथे शक्य आहे तेथील काम हाती घेण्यात येतील. जेथे बीओटी शक्य होणार नाही तेथील बसस्थानकांची कामे एसटी महामंडळामार्फत केली जातील, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना ॲड. परब म्हणाले. या प्रश्नावरील चर्चेत विधानसभा सदस्य आमदार शेखर निकम, कृष्णा गजबे यांनी सहभाग घेतला.






























































