
फेसबुकने आता रिल्स हे फिचर अधिकृपणे लाँच केले आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर आता टिकटॉकसारख्या शॉर्ट व्हिडीओची मजा घेता येणार आहे. गतवर्षीपासून कंपनी या फिचरची चाचणी करत होती. अखेर हिंदुस्थानपासून कंपनीने या फिचरची सुरुवात करण्यात आली आहे.
फेसबुकने या शॉर्ट व्हिडीओ मेकिंगला रिल्स ऑन फेसबुक असे नाव दिले आहे. फेसबुक रिल्स हे इन्स्टाग्राम रिल्सप्रमाणेच असणार आहे. या फिचरमुळे युजर्स काही सेकंदांचे शॉर्ट व्हिडीओ बनवून ते शेअर करू शकतात. हे व्हिडीओ इतरांना न्यूज फीडमध्येदेखील दिसतील. युजर फेसबुक म्युझिक लायब्ररीमधून आवडतं गाणं सिलेक्ट करून, वेगवेगळे इफेक्ट देऊन तो व्हिडीओ शेअर करू शकतील.
तसेच व्हिडीओचा स्पीडदेखील ठरवू शकतील. शॉर्ट व्हिडीओची लोकांमधली क्रेझ लक्षात घेता हे फिचर फेसबुकने आणले आहे. टीकटॉकला हिंदुस्थानात बंदी घातल्यामुळे त्याला पर्याय म्हणून अनेक कंपन्यांनी शॉर्ट व्हिडीओ ऍप लाँच केले आहे.


























































