माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याची चौकशी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणात माझ्याकडची कागदपत्रे मी सरकारकडे पाठवणारच आहे. त्याचा पाठपुरावादेखील करणार आहे. माझ्याकडे कागदपत्रे कशी आली याची चौकशी त्यांना करायची असेल तर तीही चौकशी करायला माझी काहीही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देकेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

अधिवेशनाचे कामकाज संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,  संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो आणि सचिन वाझेंना वाचवलं जातं. संजय राठोड सरकार घालवू शकत नाहीत, पण एपीआय सचिन वाझेंकडे नक्कीच काहीतरी आहे असा आरोप त्यांनी केला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शेतकऱयांची वीज मीटर न कापण्याचे आदेश द्यायचे आणि शेवटच्या दिवशी निर्णय बदलायचे असे लबाड सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिले नव्हते, असा टोला फडणवीस यांनी वीज जोडणी कापण्याच्या मुद्दय़ावरून लगावला.

गृहमंत्री देशमुखांविरोधात हक्कभंग

देवेंद्र फडणवीस यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण दाबले, या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या विधानाविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत थेट हक्कभंगच मांडला. अनिल देशमुखांपाठोपाठ त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधातही हक्कभंगाची मागणी केली, मात्र तशी सूचनाच त्यांनी दिली नसल्याने तो त्यांना मांडता आला नाही. अन्वय नाईक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वयंस्पष्ट अभिप्राय नोंदवले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख यांनी खोटे आरोप करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. अनिल देशमुख यांनी सभागृहात माझ्या बोलण्याकर बंधने आणून माझा विशेषाधिकार भंग केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी सभागृहात केली, मात्र या मागणीवर तपासून निर्णय घेतला जाईल, असे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितले.