
आर्थर रोड नाका येथील अनेक वर्षे रखडलेल्या काही चाळींचा लवकरच पुनर्विकास केला जाणार असून त्याबद्दल शिवसेनेच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक घेण्यात आली. याला पालिका तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबईतील अनेक जुन्या चाळींचा पुनर्विकास रखडला असून त्यांच्या पुनर्विकासासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. आर्थर रोड नाका येथील मोतीवाणी तसेच शिंदे-पानसरे चाळींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यात गिरगाव ते लालबागपर्यंत रस्ता रुंदीकरण होणार असून यात उड्डाणपुलाचाही समावेश आहे. त्यामुळे या दोन चाळींत राहणाऱया रहिवाशांच्या भविष्याच्या दृष्टीने लवकरच पुनर्विकास होणे गरजेचे आहे.
याची दखल घेत शिवसेना आमदार यामिनी जाधव यांच्या उपस्थितीत ए, बी आणि ई प्रभागाचे अध्यक्ष रमाकांत रहाटे यांच्या भायखळा येथील दालनात बैठक घेण्यात आली. संपूर्ण परिसराची पाहणी करून याबाबतचा निर्णय येत्या 15 दिवसांत घेण्यात येणार आहे. यावेळी ई विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर, विभाग संघटक विनय लिपारे, शाखाप्रमुख हेमंत कदम तसेच रस्ते, पूल, वाहतूक, डेव्हलपमेंट, नियोजन आणि ई विभागातील अधिकारी उपस्थित होते.




























































