अमित शहा स्वत:ला काय समजतात? मला मारायचे आहे का? – ममता बॅनर्जी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रचारसभांना लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निराश झाले आहेत. या नैराश्यातूनच अमित शहा निवडणूक आयोगाला हाताशी धरून पश्चिम बंगालमध्ये कट-कारस्थान रचत असून  लोकांचा छळ करीत आहे. माझ्या सुरक्षाप्रमुखाला हटविले. हे अमित शहा स्वतःला काय समजतात? भाजपला मला मारून टाकायचे आहे का? असा सवाल करीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्ला चढवला.

झारग्राम जिह्यात काल अमित शहा यांची प्रचारसभा रद्द झाली. तांत्रिक कारणामुळे  सभा रद्द झाल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी सभेला लोकांची अत्यल्प उपस्थिती होती. तर दुसरीकडे व्हीलचेअरवर बसून प्रचार करणाऱया ममता बॅनर्जी यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज बंपुरा जिह्यात झालेल्या सभेत ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर गंभीर आरोप करीत हल्लाबोल केला.

काय म्हणाल्या ममता बॅनर्जी…

  • अमित शहा स्वतःला काय समजतात? तुमच्या सभांना लोक येत नाहीत म्हणून तुम्ही बळाचा वापर करता का? मीडियाला तुम्ही बोलू देत नाहीत. मीडियाचे तोंड बंद करता.
  • गृहमंत्री देश चालवतात की कोलकात्यात बसून कट-कारस्थान रचतात? केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत उद्योगपतींवर धाडी टाकल्या जात आहेत. पश्चिम बंगालच्या गृहसचिवांवरही धाड टाकली. नंदीग्राम, सिंगुर आंदोलनातील लोकांना नोटिसा पाठविल्या जात आहेत.
  • निवडणूक आयोगाला मी नम्रपणे विचारते. आयोग कोण चालवतो? अमित शहा निवडणूक आयोग चालवतात का? निवडणूक आयोगाला मार्गदर्शन करणारे अमित शहा कोण आहेत. आयोगाच्या कामात ते हस्तक्षेप का करत आहेत? माझ्या सुरक्षाप्रमुखाला हटविले. हे काय चालले आहे? त्यांना मला मारून टाकायचे आहे का? माझी हत्या करण्याचा भाजपने कट रचला आहे का?