
हिंदुस्थानी क्रिकेट संघासाठी बीसीसीआयकडून टी-20 वर्ल्ड कपची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. हिंदुस्थानात या वर्षअखेरीस टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियाला टी-20 क्रिकेटचा पुरेसा सराव मिळावा यासाठी बीसीसीआयकडून दोन आंतरराष्ट्रीय टी-20 मालिका खेळवण्याचा प्रस्ताव दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे ठेवण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका मागील मालिका खेळणार
हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 2020 सालामध्ये टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात येणार होते, पण कोरोनामुळे ही मालिका पुढे ढकलण्यात आली. आता हीच मालिका पुन्हा खेळवण्यासाठी दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड उत्सुक आहेत. तसेच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशीही टी-20 मालिकेबाबत बीसीसीआयची बोलणी सुरू आहेत.
टी-20 वर्ल्ड कपनंतरही बिझी
हिंदुस्थानचा संघ मायदेशात वर्षअखेरीस होणाऱया टी-20 वर्ल्ड कपनंतरही बिझी असणार आहे. न्यूझीलंडशी मायदेशात कसोटी मालिका खेळण्यासाठी टीम इंडियाला सज्ज राहावे लागणार आहे. त्यानंतर हिंदुस्थानचा संघ दक्षिण आफ्रिकेला संपूर्ण दौऱयासाठी रवाना होईल.
आयपीएलनंतर टी-20 क्रिकेटच्या सरावाचा अभाव
हिंदुस्थानचा क्रिकेट संघ सध्या मायदेशात इंग्लंडविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळत आहे. यानंतर दोन देशांमध्ये वन डे मालिकेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेत त्यानंतर आयपीएलचा धमाका तमाम क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळेल. पण आयपीएलनंतर हिंदुस्थानी संघ टी-20ची एकही लढत खेळणार नाही. वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका या दोन स्पर्धांमध्ये हिंदुस्थानी संघ सहभागी होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी अपुऱया सरावाचा परिणाम टीम इंडियाच्या कामगिरीवर होईल अशी भीती बीसीसीआयला वाटत आहे. त्यामुळे टी-20 मालिका आयोजनाचा विचार बीसीसीआय करीत आहे.




























































