
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱया दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी मुंबई महापालिक सज्ज झाली असून 100 पर्यंत विद्यार्थीसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्याच शाळेत परीक्षा केंद्राची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे तर 100 पेक्षा कमी संख्या असलेल्या दोन ते तीन शाळांतील विद्यार्थ्यांना एकत्र करून परिसराजवळ परीक्षा केंद्रांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी दिली.
मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या खबरदारी घेत दैनंदिन व्यवहार सुरू आहेत. मात्र, शाळा, कॉलेज यांसह शैक्षणिक संस्था बंद असून ऑनलाइन अभ्यास सुरू आहे. दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असून ती ऑफलाइन म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊन होणार आहे.
यासाठी पालिका सज्ज झाली असून त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. या वर्षी दहावीसाठी मुंबईतून 15 हजार 900 विद्यार्थी बसणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेऊन ही परीक्षा होणार आहे. एखाद्या शाळेत 100 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर त्यानुसार विद्यार्थी संख्येचे योग्य ते नियोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकर यांनी दिली.
शिक्षण अधिकारी पॉझिटिव्ह
करी रोड येथील शिक्षण अधिकारी कार्यालयात काही दिवसांपूर्वी अकाऊंट विभागातील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शिक्षण अधिकाऱयाचे सहकारी, शिक्षण अधिकारी महेश पालकर, त्यांची मुलगी, त्यांचा चालक तसेच इतर काही सहकारी शनिवारी पॉझिटिव्ह आढळल्याच्या पार्श्वभूमीवर कार्यालयातील सर्व विभागातील 360 कर्मचाऱयांची कोरोना चाचणी सोमवार, 22 मार्चला करण्यात येणार आहे.



























































