हिंदुस्थानी संघाचे निर्विवाद यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाने इंग्लंडला क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हरवलं. आधी कसोटी, मग टी-ट्वेन्टी आणि आता वन-डे. याला निर्विवाद यश म्हणतात.

अर्थात यश मिळवताना हिंदुस्थानी संघाला काही वेळा वादळातून, काही वेळा निखाऱयातून, काही वेळा काटय़ांतून जावं लागलं. घाम गाळून मिळालेलं यश सुगंधी असतं. त्या घामाला सुगंध येतो. तोच तो सुगंधी घाम शेवटच्या सामन्यात मॅच आणि सीरिज जिंकताना हिंदुस्थानी संघाने अनुभवला. उत्तम खेळपट्टय़ांवर उत्तम खेळ पाहिल्याचं समाधान मिळालं.

पहिला सामना हिंदुस्थानी संघाने इंग्लंडकडून खेचून घेतला. 318 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा धावफलक एका क्षणी बिनबाद 135 असा होता. तब्बल 35 षटकं आणि चार चेंडू शिल्लक होते, 10 विकेट्स हातात होत्या त्या होत्याच आणि मधली षटकं सुरू होती. म्हणजे फक्त चार क्षेत्ररक्षक वर्तुळाबाहेर होते. चेंडू ढकलूनसुद्धा आरामात धावा काढता आल्या असत्या. चेंडू ढकलायचे. एकेरी, दुहेरी धावा घ्यायच्या आणि मग एखादा मधला मोठा फटका मारला की, रनरेटसुद्धा आरामात ऍडजेस्ट होतो, पण ती गोष्ट इंग्लंडला जमली नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हिंदुस्थानी गोलंदाजांनी मधली षटकं अप्रतिम टाकली आणि इंग्लंडचा डाव अक्षरशः 42 व्या षटकात 251वर कोसळला.

दुसरा सामना आपल्या हातून बेअरस्टो आणि विशेषतः स्टोक्सने खेचून घेतला. स्टोक्सची खेळी ही ‘स्ट्रोक्स’ची खेळी होती. त्यातल्या स्ट्रोक्सला फटके म्हणणं म्हणजे तोफेला पिस्तूल म्हणण्यासारखं आहे. त्या खेळीमध्ये तो रॅम्बो वाटत होता आणि त्याची बॅट आग ओकत होती. सर्वच हिंदुस्थानी गोलंदाज भाजले. कुलदीप यादव हा सगळ्यात जास्त भाजला. त्याची पुढची करीअरच पूर्णपणे भाजली गेली अशी मला भीती वाटते. कृणाल पंडय़ाही आगीत भयंकर होरपळला. स्टोक्सने त्याच्या त्या फटक्यांच्या वादळात बरेच शुद्ध तुपातले फटके मारले. थेट समोरच्या व्हीमध्ये. बॅटचा स्विंग, बॅटचं ते वेगात खाली येणं, टायमिंग आणि फटका मारताना पोझिशनमध्ये येणं  या सगळ्याच गोष्टी पाहण्यासारख्या होत्या. ती अशी खेळी होती की, ती हिंदुस्थानविरुद्ध असूनही परक्या फलंदाजाच्या प्रेमात पडावं. बायकोशी एकनिष्ठ राहताना परस्त्र्ााrच्या सौंदर्याने घायाळ व्हावं तशी परिस्थिती होती. त्याला 99 वर भुवनेश्वर कुमारने बाद केलं. मला असं वाटतं की, त्यात भुवनेश्वर कुमारने अतिशय सुंदर आपलं डोकं वापरलं. त्याने योग्य दिशेने बाऊन्सर टाकला. तो मारायला जाणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. चेंडूची दिशा, बाऊन्स यात थोडा जरी फरक पडला असता ना, तर तो चेंडू सीमापार स्टॅन्डमध्ये जाऊन पडला असता, पण योग्य टप्प्यावर, योग्य दिशेने पडला आणि त्याला योग्य बाऊन्स मिळाला. त्यामुळे तो थेट यष्टिरक्षकाच्या हातात गेला. नंतर पुन्हा हिंदुस्थानी गोलंदाजी इंग्लंडच्या मधल्या फळीला डसली, पण तोपर्यंत त्यांच्या अंगात विष भिनण्याइतक्या धावा शिल्लक राहिलेल्या नव्हत्या. त्यामुळे इंग्लंड संघाने ती मॅच जिंकली.

तिसऱया वन-डेत सर्वच उलटंपुलटं झालं. आक्रमक सुरुवात होऊनही हिंदुस्थानी संघ पूर्ण 50 षटकं खेळला नाही. ज्या इंग्लंडच्या आघाडीच्या जोडीने म्हणजे बेअरस्टो आणि रॉयने आतापर्यंत त्यांना झंझावाती सुरुवात करून दिली होती, ती जोडी या वेळेला अपयशी ठरली. हिंदुस्थानी संघात झेल सोडण्याची स्पर्धा सुरू असताना विराट कोहलीने आदिल रशीदचा जो झेल घेतला तो एका शब्दात सांगायचा तर ‘असामान्य’ होता. म्हणजे ती झेप घ्यायची, तिथं पोचायचं आणि तो एका हातात झेल घ्यायचा हे सगळं करण्यासाठी फक्त विराट कोहलीच तिथे हवा होता, दुसरा कुणीही नाही. या आदिल रशीदने विराटला गुगलीवर रडवलेलं. त्याचं उट्टं विराटने या झेलने काढलं. तो किती महत्त्वाचा होता हे शेवटी जेव्हा सॅम करन एकहाती किनाऱयाकडे पोहत निघाला होता, तेव्हा जाणवलं.

फलंदाजीच्या बाबतीत हिंदुस्थानी संघ बऱयाचदा 11 फलंदाज घेऊन खेळतो की काय, असं वाटलं. तो कसाही कोसळला तरी शेवटी धावा करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर आता अवलंबून राहायचे दिवस संपलेत. त्यांनी थोडाफार पाया घालून दिला की, वरचे मजले आरामात आणि वेगात चढवले जातात. पंत तर प्रत्येक खेळीबरोबर प्रगल्भ होत चाललाय. त्याच्या डोक्यात क्षेत्ररचना बॅटिंग करताना पक्की असते. त्यामुळे तो योग्य वेळी फटक्यात इम्प्रोव्हायझेशन करताना दिसतो. मुख्य म्हणजे त्याच्या बॅटिंगप्रमाणे त्याचं यष्टिरक्षण सुधारतंय. पूर्वी त्याच्या यष्टिरक्षणाकडे पाहिलं की, हा मुलगा हॉकी, फुटबॉलमध्ये गोलकीपर म्हणून का करीअर करत नाही असं वाटायचं. आता तो यष्टिरक्षक वाटायला लागलाय. दुसऱया मॅचमध्ये बेअरस्टोची विकेट भुवनेश्वरच्या नावावर जरी लागली असली तरी त्यात पंतचा वाटा मोठा होता. बेअरस्टो क्रीझच्या पुढे उभं राहून योग्य ठिकाणी चेंडूला भिडतो हे पाहिल्यावर पंत थेट मागून पुढे आला आणि यष्टीला चिकटून उभा राहिला. त्यामुळे बेअरस्टोला क्रीझमधून खेळावं लागलं आणि तो फसला. वेगवान गोलंदाजाला पुढे राहून यष्टिरक्षण करणं ही सोपी गोष्ट नाही. त्याला आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास आता पंतने मिळवलाय.

हार्दिक पंडय़ाचे चाबूक जगातल्या कुठल्या गोलंदाजीच्या पाठीवर वळ उमटवू शकतात. आणखी दोघांचं कौतुक करायला पाहिजे, एक धवन. मला वाटतं धवनला अलीकडे वन-डेचाच फॉरमॅट जास्त भावतो. पहिल्या आणि तिसऱया वन-डेमध्ये जिंकण्यात त्याच्या धावांचा वाटा महत्त्वाचा होता आणि दुसरा अर्थात राहुल. राहुल हा दर्जेदार खेळाडू आहे यात शंकाच नाही, पण महत्त्वाचं होतं ते तीन शून्ये पचवून तो उभा राहिला, वन-डेत खाली येऊन धावा केल्या आणि शतकसुद्धा ठोकलं.

हिंदुस्थानी गोलंदाजीच्या बाबतीतसुद्धा जो नवा खेळाडू येतो तो परफॉर्मन्स देऊन जातो. उदा. प्रसिद्ध कृष्णा. मी हे नाव फक्त ऐकलं होतं, त्यापेक्षा अधिक काही नाही. भुवनेश्वर कुमारने बोहल्यावर चढलेल्या बुमराहची आठवणसुद्धा येऊ दिली नाही. पहिला स्पेल असो किंवा नंतर जोडी फोडण्यासाठी त्याला कर्णधाराने दिलेलं आमंत्रण असो किंवा शेवटच्या हाणामारीच्या षटकातली षटकं असोत, त्याने अप्रतिम गोलंदाजी टाकली. तो त्याच्या स्विंगसाठी प्रसिद्ध आहे, पण खेळपट्टीवर कुठला टप्पा गरजेचा आहे,  त्या टप्प्याप्रमाणे  ऍडजेस्ट होणं त्याला सगळ्यात लवकर जमायचं. मधल्या आणि खालच्या षटकात शार्दूल ठाकूर आता मॅच विनर ठरतोय. काही वेळा एका हाताने तो धावा देतो. पण दुसऱया हाताने तो बळीसुद्धा मिळवून देतो. वन-डेमध्ये बळी मिळणं फार महत्त्वाचं असतं, नुसत्या धावा रोखणं नव्हे. याचं कारण तुम्ही लवकरात लवकर त्याच्या तळाच्या फलंदाजांपर्यंत जाऊ शकता. जर बळी गेलेले असतील तर शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये जोखीम घेणं हे कठीण असतं. त्याच्या गोलंदाजीमधलं जे वैविध्य आहे, म्हणजे त्याचा नकल बॉल किंवा त्याचा स्लोवर वन यावर मोठे फटके मारताना इंग्लिश फलंदाज फसत होते आणि ठाकूरला विकेट मिळत होत्या. महत्त्वाचं असं होतं की, मार खाऊनसुद्धा तो एका क्षणात पुन्हा उभा राहायचा आणि प्रत्युत्तर द्यायचा. हा त्याचा जो आत्मविश्वास आहे, प्रतिहल्ला करण्याची जी ताकद आहे, ती ताकद मला सगळ्यात जास्त भावली.

आणखी एक फार चांगली गोष्ट पाहायला मिळाली की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामधले वाद निदान मैदानावर तरी मिटल्यासारखे वाटले. दोघेही राम – लक्ष्मणासारखे वावरताना दिसत होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विराटला रोहित सल्ला देत होता आणि विराट तो निमूटपणे ऐकत होता, त्या सल्ल्याला तो आदर देत होता. हिंदुस्थानी संघातील लोकशाही पाहून बरं वाटलं. हिंदुस्थानी क्रिकेट हे असंच फुलावं, मोठं व्हावं हीच इच्छा.