
कोरोना महामारीच्या सुरुवातीला ढेपाळलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत जीएसटी वसुलीने तरतरी आणली आहे. मागील पाच महिने 1 लाख कोटींच्या पुढे मजल मारलेल्या करवसुलीने मार्चमध्ये नवीन विक्रम नोंदवला. या महिन्यात देशाच्या तिजोरीत तब्बल 1 लाख 23 हजार 902 कोटींची भर पडली. एरव्ही तिजोरीतील खडखडाटाचे कारण सांगणारे केंद्र सरकार या रेकॉर्डब्रेक वसुलीनंतर जनतेला कोणता दिलासा देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जीएसटी लागू झाल्यानंतर मार्चमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी वसूल झाला आहे. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये 97,590 कोटींची जीएसटी वसुली झाली होती. त्या तुलनेत गेल्या महिन्यातील करवसुली 27 टक्क्यांनी वाढली आहे. सलग सहाव्या महिन्यात 1 लाख कोटींवर जीएसटी वसुली नोंद झाली आहे. वस्तूंच्या आयातीपासून मिळणाऱया जीएसटीमध्ये 70 टक्क्यांची वाढ झाली आहे, तर देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल 17 टक्क्यांनी वाढला आहे. जीएसटीची पथके सर्व राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर कंपन्यांची झाडाझडती घेत आहेत. बोगस पंपन्या आणि बिलांच्या झडतीतून वसुलीचा टक्का वाढला आहे.
महाराष्ट्राची सरस कामगिरी
केंद्राच्या जीएसटी वसुली मोहिमेला महाराष्ट्राने सरस कामगिरी करून मोठा हातभार लावला आहे. राज्यांच्या यादीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून येथे 17,038 कोटींचा जीएसटी वसूल झाला. त्यापाठोपाठ गुजरात (8,197), कर्नाटक (7,914), तामीळनाडू (7,579) आणि उत्तर प्रदेश (6,265) या राज्यांचा क्रमांक लागतो.
कुठून, किती कर मिळाला?
(रक्कम कोटी रुपयांत)
- सीजीएसटी – 22,973
- एसजीएसटी – 29,329
- आयजीएसटी – 62,842

























































