
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानतळावर कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार टर्मिनलवर प्रवेश करताना प्रवाशाच्या तोंडावर व्यवस्थित मास्क असेल तरच त्याला आतामध्ये प्रवेश देण्यात यावा असे निर्देश देशातील सर्व विमानतळ प्राधिकरणाला दिले आहेत. तसेच विमानामध्ये बसल्यानंतर उतरेपर्यंत एखाद्या प्रवाशाने मास्क उतरवल्यास त्याचे नाव नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकावे असेही बजावले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी डीजीसीएने नवीन गाईडलाईन जारी करत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी असे स्पष्ट केले आहे. त्याबाबतचे पत्र सर्व विमानतळांना पाठवले आहे. त्यानुसार विमानतळावर मास्कशिवाय कोणालाही एण्ट्री दिली जाऊ नये, ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करून मास्क न घालणाऱयांवर वॉच ठेवावा.
तसेच प्रवाशाकडून नियमाचे उल्लंघन होत असेल तर तत्काळ कारवाई करून विमान प्रवासापासून रोखावे असेही स्पष्ट केले आहे. विमानात एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास किंवा अर्धवट स्थितीत घातलेला असेल तर त्याला नो फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याबाबत डीजीसीएने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयासोबत चर्चा केली आहे.


























































