पुण्यात रात्रीची संचारबंदी, आजपासून कडक निर्बंध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - चंद्रकांत पालकर

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हय़ात आजपासून पुढील सात दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हॉटेल्स, बार, रेस्टॉरन्ट, मॉल्स, सिनेमागृह, पीएमपीएल बस, धार्मिक स्थळे, आठवडे बाजार सात दिवसांसाठी बंद राहणार आहेत.

दिवसा जमावबंदी असून सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत संचारबंदी राहून 12 तास पुणे लॉक असणार आहे. पुणेकरांना सहाच्या आत घरात जावे लागणार आहे. लग्न आणि अंत्यसंस्कार याशिवाय कोणतेही सामाजिक, सांस्पृतिक, राजकीय कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

काय बंद

हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, मॉल्स, सिनेमागृहे सात दिवसांसाठी बंद.
पीएमपीएल बसेस, धार्मिक स्थळे बंद
सायंकाळी 6 ते सकाळी 6 या कालावधीत संचारबंदी
कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
30 एप्रिलपर्यंत शाळा, कॉलेजेस बंदच; पण परीक्षा होणार
दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी

काय सुरू

हॉटेल पार्सल सेवा सुरू राहतील
अत्यावश्यक सेवा सुरू राहतील
लग्नाला 50 लोकांच्या उपस्थितीची अट
अंत्यविधीला 20 लोकांची उपस्थिती
उद्याने सकाळी सुरू राहणार
आधी ठरलेल्या लग्नसोहळ्य़ांनाच परवानगी
नियोजित परीक्षा ठरल्याप्रमाणे पार पडतील

कामावरून घरी जाणाऱयांना त्रास देणार नाही

पोलिसांना अंमलबजावणी करणे सोपे व्हावे यादृष्टीने पावले उचलली जातील. आता चेकपोस्ट पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. सायंकाळी सहानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र बहुतांश कार्यालये सहा वाजता सुटतात. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱयांना पोलीस त्रास देणार नाहीत, असे सहपोलीस आयुक्त राजेंद्र शिसवे यांनी सांगितले.