खेळाडू वारंवार पंचांवर शंका घेतो, तेव्हा त्याच्या खेळातच दोष असतो! पंतप्रधानांची ममता बॅनर्जींवर बोचरी टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूक प्रचारात वारंवार निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱयात उभ्या करणाऱया ममता बॅनर्जी यांच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली आहे. कारण मैदानात वारंवार पंचांच्या निर्णयावर टीका करणाऱया खेळाडूच्या खेळातच दोष असतो. म्हणूनच तो आपले वैगुण्य लपवण्यासाठी पंचांना लक्ष्य करतो. तसेच काहीसे ममता दीदींचे झाले आहे, अशी बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुगळीच्या तारकेश्वर येथील प्रचारसभेत बोलताना केली आहे. येत्या 6 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये तिसऱया टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.

दीदी, स्वाभिमानी बंगाली मतदारांचा अपमान करू नका!

भाजपच्या प्रचार सभांना जमलेली गर्दी ही पैसे देऊन आणलेल्या लोकांची आहे, अशी टीका करून ममता दीदी आपल्याच बंगालच्या नागरिकांचा अपमान करीत आहेत, असाही आरोप मोदी यांनी केला.

बंगाली नागरिक हे स्वाभिमानी आणि लढाऊ बाण्याचे आहेत. ते विकले जाऊ शकतात, असे तुम्हाला कसे वाटते, असा सवाल करीत मोदी म्हणाले, दीदी याच लोकांनी तुम्हाला 10 वर्षे सत्ता दिलीय. त्यांनाच तुम्ही विकाऊ ठरवता हे योग्य नाही, असेही मोदी यांनी ममता बॅनर्जी यांना शेवटी सुनावले.

ममता बॅनर्जींना नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा पश्चात्ताप होतो आहे. तृणमूल काँग्रेसमधले लोकच सांगतात की ममता बॅनर्जींनी रागात नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी ही सर्वात मोठी चूक केली.