मुखवटे सोलताना – भेसूर जगाच्या वाटेवर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>  मलिका अमरशेख

सुख-दुःख कवेत घेतलेलं जगणं जगल्यानंतरही वाटय़ाला येणारी तृप्तता हिरावून घेणाऱया आजाराच्या फेऱयात अवघं जग अडकलं आहे. दुःखाचा एक वेगळा आणि अतिव्यापक भेसूर पोत आपण अनुभवत आहोत. या हेलकाव्यात भविष्यातलं अंताच्या उंबरठय़ावरचं जग नेमकं कसं असेल… विचार करणं ही नकोसं वाटावं इतकं गूढ यात लपलं आहे. अशाच भविष्यातल्या भेसूर; पण काल्पनिक शक्यतेचे हे वर्णन.

तो निळय़ा रंगाचा जो ग्रह दिसतोय… तिथं आज आपण जाणार आहोत. त्या ग्रहाचा इतिहास फारच रोमहर्षक आहे. आपल्या लोकांनी जी माहिती आणली यापूर्वी तिथं जाऊन त्यावरून असं दिसतं ते लोक बऱयापैकी प्रगत होते. त्यांच्याकडे वाहनेही होती, पण ते स्वतःच ते चालवत. त्यांच्याकडे वर्णव्यवस्था इतकी होती की, ते स्त्रियांना वेगळा नियम व पुरुषांना वेगळा नियम लावायचे. मुलांना जन्म स्त्रियाच देत होत्या. त्याबाबतीत ते तसे मागासलेले होते. मुलांना वाढवण्याचे पण वेगळे नियम होते. सर्व धातू, खनिज, पाणी, वीज… सर्व असूनही ते असमाधानी होते व वारंवार टोळीयुद्ध, संघर्ष, प्रचंड हिंसाचार होत होता. त्यांनी बरेच शोधही लावले न् नंतर त्यांनी लावलेल्या शोधांनीच त्यांनी एकमेकांना नष्ट केले.

चला.. आलो आपण… यानातून खाली उतरा… थांबा, मला शोधपट्टीवर बघू द्या. हं… हे खूपसं पाणी दिसतंय. हं… इथं एक छोटंसं बेट होतं. चला, खाली पाण्यात खोलवर उतरू. हे पहा, मोठं दगडी प्रवेशद्वार दिसतंय का? याला ते लोक… अं.. गेटवे ऑफ इंडिया म्हणायचे बरं.. हं, चला पुढे. हा समुद्रातला पर्वत नसून त्यांनी बांधलेल्या प्रचंड घरांचे अवशेष एकत्र झालेत. याचा अर्थ असा की, एवढय़ाशा बेटावर प्रचंड प्रमाणात लोकवस्ती असावी. हा समुद्रतळ इतका गुळगुळीत कसा? कुणी विचारला हा मूर्ख प्रश्न? हे त्यांनी बांधलेले रस्ते आहेत न् ते गुळगुळीत वगैरे नाहीत… खूप खाचखळगे, खड्डे आहेत त्यावर. झाडं-पशुपक्षी यांचं वैविध्य असूनही न जपल्यामुळे झाडं-पशुपक्षी नष्ट झाले… आता इथले मृत पशुपक्षी आणि झाडांचे जिवाश्म आपल्या इथल्या म्युझियममध्ये तुम्ही मागच्या वेळेला पाहिलेच असतील…ज्याला ते… अं.. काय बरं हं… मिळालं…वाघ, सिंह, चिमण्या असं त्यांना म्हणायचे.

चला, पुढे चला… हे काळय़ा दगडाचं विशाल बांधकाम, गोल घुमट असलेलं काय? थांबा, शोधपट्टीवर शोधतो… हं सापडलं… त्याला ते ताजमहाल म्हणायचे. पहिल्यांदा तो पांढराशुभ्र होता म्हणे, पण पोल्युशन न् सतत बॉम्बस्फोट यानं तो पांढऱयाचा पूर्ण ‘काळा महाल’ झाला.

चला, पुढे चला… थांबा… हे काय खूपच पुढं आलो… काय बरं… या जलमृत शहरात तर एकही अवशेष नाही… ओः.. ही एक पाटी पहा… पाण्यात रुतलेल्या दगडात अडकून बसलीय. बघू… मला वाटतं ही त्यांची इंग्रजी भाषा आहे… न् त्यावर इंग्रजीत नाव आहे ‘व्हाइट हाऊस.’

सर्वाधिक जास्त बॉम्बस्फोट करणारा न स्वतःवर करून घेणारा देश म्हणून हा प्रसिद्ध असल्याचा आपल्याकडचा इतिहास सांगतो. अर्थातच इथं कसलेच अवशेष नाहीत. यांना हिंसा करायला आवडायचं असंही आपल्याकडले मनोवैज्ञानिक सांगतात.

चला, पुढे चला… हे लाल पाणी कसलं? हं बघू… नक्कीच हा रशिया नावाचा भूखंड असावा. यांचा इतिहास फार विचित्र. चंद्रावर यान सोडण्याचा विचार करणारे इथले लोक, स्वतःच्या नेत्याचं मृत शरीर मात्र मसाला भरून शेकडो वर्षे जतन करून ठेवलेलं होतं… ते पहा अजून आहे. किती अघोरीपणा… पृथ्वीतळावरच्या मूर्ख माणसांचा… जिवंत लोकांना जिवंत जाळतात न् मेलेल्यांना जपून ठेवतात… न् ज्यांना मेलेल्यावर पण प्रेत फोटो, मूर्तींमध्ये जपून ठेवतात. त्याचे विचार मात्र जपत नव्हते. किती अजब मानवजात होती यावर… निव्वळ दुर्दैवी… इतका सुंदर, समृद्ध ग्रह लाभला होता… मोसमही शिस्तशीर होते पूर्वीच्या काळी… पण यांच्या अंदाधुंदीनं कालचक्रही बदललं. बेसुमार जंगलतोड… प्रदूषण… यानं पावसाळा, उन्हाळा, हिवाळा.. तिन्ही ऋतू या ग्रहावरले डोकं फिरल्याप्रमाणे कधीही येऊ-जाऊ लागले… कधी अति तर कधी काहीच नाही.

… ती लांबच लांब भिंत?… नक्कीच चीनच असणार. नमूद केलंय शोधपट्टीत… या देशानं अनेक भिंती निर्माण केल्या न् तोडल्याही. अनेक जीवजंतू खाणारा न् नवीन जंतू निर्माण करणारा देश.

तो चिमुकला भूभाग… हादरतोय ना? जपानच असणार… कायम तिथं भूकंप… सुनामी, पण तिथले मानव कायम कामात, शोध लावण्यात मग्न.

चला… आपली पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण झाली… आता परत आपल्या स्वगृही म्हणजे मंगळावर जाऊ… उद्या आपल्याला गुरू नावाचा ग्रह बघायचाय… नीट बघून घ्या… ही सुंदर, पण आता निर्मनुष्य, उदास असलेली पृथ्वी… ते काय थरथरतंय सूक्ष्म… पाहू… छान… पहिला मत्स्यजीव आहे.

पृथ्वीवर नवीन श्वास जन्माला आला तर! अजून काही अब्ज वर्षांनी पुन्हा मानव जन्म घेणार तर! आतासारख्या चुका केल्या नाही तर भेटूच त्याला समोर!

 [email protected]