
तरूणाच्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. सौरभ तीमापा धनगर ( वय 22 रा. ताडीवाला रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, निखील जाधव, कादिर शेख व समीर पटेल रविवारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी त्यांना बंडगार्डन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपी सौरभ धनगरची माहिती मिळाली. तो नदी पात्रात लपून बसलेला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सौरभ विरुद्ध शरीर आणि मालविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.


























































