श्रीरामपुरात ‘रेमडेसिवीर’चा काळाबाजार; दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काल नगर शहरातील भिंगार परिसरात या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱया डॉक्टर दाम्पत्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला होता. आता श्रीरामपूरातही या इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, डॉक्टरचा शोध सुरू आहे.

शुभम श्रीराम जाधव ( रा. कोल्हार ता. राहाता), प्रवीण प्रदीप खुने, (रा. भातंब्री ता. बार्शी, जि. सोलापुर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 36 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रेल्वे कॉलनीतील एका युवतीने सोमवारी सकाळी वडिलांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन औषध मिळविण्यासाठी प्रयत्न केले. तिला जास्त किमतीने दोघेजण औषध देणार असल्याची माहिती संजय रुपटके यांना मिळाली. त्यांनी त्यांचे मित्र गणेश जायगुडे, सोमनाथ कदम यांना घेऊन इंजेक्शन घेण्यासाठी पैसे नेऊन दिले. तेथेच थांबून सोमनाथ कदम याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नरवडे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कॉन्स्टेबल नरवडे, हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवी यांनी तेथे धाव घेऊन सापळा रचला. काही वेळाने तीन तरूण दुचाकीवरून तेथे आले. त्यांनी या तरुणीला 4 हजार 800 रुपये किंमतीचे इंजेक्शन औषध 20 हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी झडप घालून दाषघांना पकडले. तर, त्यांचा एक साथीदार फरार झाला. आपण डॉ. अक्षय शिरसाठ यांच्याकडे वॉर्डबॉय म्हणून काम करत असून, त्यांनीच रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे पोलिसांना सांगितले.