
‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात गुरुवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. ‘विस्डेन अलमॅनाक’ने त्याची 2010 ते 2020 या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड केली. याचबरोबर कपिलदेव यांचा 80 च्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, तर सचिन तेंडुलकरचा 90 च्या दशकातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून गौरव करण्यात आला आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांना 50 वर्षे पूर्ण झाल्याने दशकातील पाच एकदिवसीय क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली आहे. 1971 ते 2021 या कालावधीतील पाच क्रिकेटपटूंना हा मान देण्यात आला आहे. विराट कोहलीने 2008 साली श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. विराटने 254 एकदिवसीय सामन्यांत 12 हजार 169 धावा फटकावल्या आहेत. 2011च्या जगज्जेत्या ‘टीम इंडिया’चा सदस्य असलेल्या विराटने दहा वर्षांत 42 शतकांसह 11 हजारांहून अधिक धावांची लयलूट केली आहे. विश्वविक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि कपिलदेव या महान क्रिकेटपटूंनाही ‘विस्डेन अलमॅनाक’ने मान दिला आहे. 90च्या दशकात केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी सचिनची सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. सचिनने 1998 मध्ये 9 शतके ठोकली होती. कपिलदेव यांना 80 च्या दशकातील कामगिरीसाठी हा बहुमान देण्यात आला आहे. कपिलदेव यांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानने 1983 साली विश्वचषक जिंकून इतिहास घडविला होता. या दशकात कपिलदेव यांनी सर्वाधिक बळी टिपले होते. याचबरोबर सार्वाधिक स्ट्राइक रेटने एक हजाराहून अधिक धावाही चोपल्या होत्या.
बेन स्टोक्स दुसऱयांदा सर्वोत्तम खेळाडू
‘विस्डेन अलमॅनाक’ने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सची सलग दुसऱया वर्षी ‘सर्वोत्तम क्रिकेटपटू’ म्हणून निवड केली आहे. स्टोक्सने गतवर्षी 58 कसोटी सामन्यांत 641 धावा फटकावल्या असून 19 बळीही टिपले होते. ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी हिला ‘सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू’ म्हणून गौरविण्यात आले आहे. वेस्ट इंडीजचा कायरॉन पोलार्ड हा टी-20 क्रिकेटमधील ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’ ठरला आहे.


























































