‘हाफकिन’ बनवणार कोव्हॅक्सीन लस, केंद्र सरकारची मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की,  सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरू करावे तसेच हाफकिनमध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱयाची नियुक्ती करण्यासदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्य सचिवांना सांगितले.