
पूर्ववैमन्यस्यातून टोळक्याने एका तरूणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत माजविण्यासाठी वाहनांची तोडफोड करीत राडा घातल्याची घटना दोन दिवसांपुर्वी रात्री सव्वा अकराच्या सुमारास घोरपड पेठेतील नेहरू मित्र मंडळ परिसरात घडली.
तजमूल पठाण , अबिद मोकाशी, इम्रान खान, तौसिफ खान, फैजल मुजाहिद्द (सर्व रा. मोमिनपुरा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिषेक उर्फ बाप्पा कसबे (वय 31, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
अभिषेक आणि त्यांचा मेव्हणा गणेश मोरे दोन दिवसांपुर्वी दुचाकीवरुन गुरुवार पेठेतील मित्राला भेटण्यासाठी चालले होते. त्यावेळी 7 ते 8 वर्षांपर्वी झालेल्या भांडणाचा राग मनामध्ये धरून आरोपी तजमूल आणि इतर साथीदारांनी अभिषेकला अडविले. त्याच्यावर कोयत्याने वार करून जखमी करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय गणेश मोरे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. आम्ही इथले भाई आहेत, जर कोणी आमच्या विरोधात गेले तर त्याचा मुडदा पाडू असे म्हणत हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली. त्याशिवाय परिसरातील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे तपास करीत आहेत.

































































