
कोरोनाचा काळ म्हणजे आधीच आणीबाणीची वेळ. मुंबईतील सहा कोरोना रुग्णालयांतील 168 ऑक्सिजन बेड आणि आयसीयू बेडवरील रुग्णांचा ऑक्सिजन साठा संपू लागला होता. ऑक्सिजन पुरवठादारांचे टँकर हा साठा संपल्यानंतर पोहोचणार असल्याचे लक्षात येताच मुंबई महापालिकेने तातडीने ऑपरेशन शिफ्टिंग सुरू केले. अतिरिक्त आयुक्तांसह सहा रुग्णालयांतील अधिष्ठाता, अधीक्षक, आरोग्य अधिकारी, परिचारिका ते अगदी वॉर्डबॉय अशा तब्बल 125 जणांनी रात्री साडेनऊ ते सकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल साडेआठ तास न दमता हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले.
रात्री साडेनऊ वाजता प्रत्यक्ष ऑपेरशन शिफ्टिंगला सुरुवात झाली. वाद्रय़ातील भाभा, कुर्ल्यातील भाभा, बोरिवलीतील भगवती, गोवंडीतील शताब्दी, मुलुंडमधील अगरवाल आणि जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयातील 168 रुग्णांना हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. या रुग्णांना जिथे ऑक्सिजनसाठा आहे अशा बीकेसी, नेस्को, दहिसर, मुलुंड जम्बो रुग्णालय आणि अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिफ्टिंग करताना कोणतीही कागदोपत्री कार्यवाही करू नये, पहिल्यांदा रुग्णांना अॅडमिट करून घ्या आणि दाखल करून घेतल्यानंतर कागदोपत्री कार्यवाही करा, असे सक्त आदेश काकाणी यांनी दिले होते.
रात्रीची वेळ ठरली मोक्याची
ऑपरेशन शिफ्टिंगला रात्रीची वेळ मोक्याची ठरली. रुग्णांना दुसऱया रुग्णालयांत हलवताना रस्त्यावर अजिबात रहदारी नव्हती. त्यामुळे रुग्णांना शिफ्ट करताना शिफ्टिंग वेगाने झाली. रात्रीच्या वेळी शिफ्टिंग करण्यात येत असलेल्या रुग्णालयांत गर्दी नव्हती. त्यामुळे कमी वेळेत वेगाने मोहीम फत्ते करणे शक्य झाले.
पालिकेचे टीमवर्क
ही सगळी मोहीम यशस्वी झाली ती केवळ टीमवर्कमुळेच. सहा पालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता, अधीक्षक, वॉर्ड ऑफिसर्स, डॉक्टर्स, परिचारिका अगदी वॉर्डबॉयही या टीमवर्कमध्ये सहभागी होते. पालिका आयुक्त चहल यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी विविध टप्प्यांत या मोहिमेवर लक्ष ठेवले. तब्बल साडेआठ तासानंतर सकाळी 6 वाजता ही मोहीम यशस्वी झाली. त्यानंतरच आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला, असे काकाणी यांनी सांगितले.
ऑक्सिजनचा साठा वाढणार
मुंबईतील पालिकेच्या कोरोना रुग्णालये आणि कोरोना सेंटर्ससाठी दररोज 235 मेट्रिक टन साठा लागतो. त्यानुसार पालिकेला ऑयनॉक्स आणि लिंडा हे दोन पुरवठादार हा साठा पुरवतात. मात्र वेळेत साठा न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या या प्रसंगावरून आम्ही आणखी एका पुरवठादाराकडून ऑक्सिजनचा साठा मागवण्याचा निर्णय तातडीने घेतला आहे. त्यामुळे आणखी 50 मेट्रिक टन साठा वाढणार आहे. शुक्रवारी रात्री निर्माण झालेल्या प्रसंगासारखा प्रसंग येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. उद्या सोमवारपासून ऑक्सिजनचा साठा वाढणार आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली.
आयुक्तांनी दिला हिरवा कंदील
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नेहमीप्रमाणे दुपारी पालिका रुग्णालयांतील रुग्णांची स्थिती, औषधसाठा, उपकरणे, ऑक्सिजन यांचा आढावा घेतला. हा आढावा घेताना पालिकेच्या 6 रुग्णालयांतील साठा रात्री उशिरा संपणार आहे आणि या रुग्णालयांना पुरवठा करणारे टँकर वेळेवर पोहोचू शकणार नाहीत हे लक्षात आल्यावर त्यांनी ऑक्सिजन बेड आणि आयसीयूतील 168 रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरेसा साठा असलेल्या रुग्णालयांत हलवण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळी साडेपाचला याची कल्पना पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना देण्यात आली आणि त्यांनी या मोहिमेसाठी हिरवा पंदील दाखवताच चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू झाली.
आयसीयूतील रुग्णांसाठी कार्डियाक रुग्णवाहिका तर ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड असलेल्या रुग्णवाहिकांचा शोध संध्याकाळी 6 पासून सुरू झाला. काही रुग्णवाहिका वॉररूम तर काही वॉर्डमधून उपलब्ध झाल्या.
महापालिकेच्या सहा रुग्णालयांतील प्राणवायूचा साठा कमी पडू लागल्यानंतर महापालिका टीमने 30 आयसीयूतील रुग्णांसह 168 जणांना एका रात्रीत जम्बो कोरोना रुग्णालयांत हलवून त्यांचे प्राण वाचवले. कोणतीही दुर्दैवी घटना न घडता शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत सर्वात मोठे रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठीचे हे ऑपरेशन यशस्वीरीत्या पार पडले. माझ्या आयुष्यातील ही सर्वात कठीण रात्र होती, मात्र तिचा शेवट समाधानाने झाला.
– इक्बालसिंह चहल, आयुक्त
























































