
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने आज रात्रीपासून राज्यभरात कडक निर्बंध लागू केले. येत्या 1 मेपर्यंत हे निर्बंध असणार आहेत. या कालावधीत वृत्तपत्रांचे वितरण मात्र अखंडपणे सुरू ठेवता येईल, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.
वृत्तपत्रे ही अत्यावश्यक सेवाच असून वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणावर कोणतीही बंदी नाही, असे राज्य सरकारच्या यापूर्वीच्या 13 एप्रिलच्या आदेशातच स्पष्ट करण्यात आले होते. पोलिसांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना सहकार्य करावे, अशा सूचनाही संबंधित यंत्रणेकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आजपासून लागू झालेल्या निर्बंधाच्या कालावधीतही वृत्तपत्रांच्या वितरणावर कोणतीही बंधने नसतील. वृत्तपत्रांचे घरोघरी जाऊन वितरण करता येणार आहे. वृत्तपत्र विक्रीचे स्टॉल्स लावता येणार आहेत. वृत्तपत्रांची छपाई, विक्री आणि वितरणाला परवानगी असल्याने वृत्तपत्रांची कार्यालये आणि प्रिंटिंग प्रेस या कालावधीत सुरू राहणार आहेत. वृत्तपत्रांची कार्यालये आणि प्रेसमध्ये काम करणारे बहुतांश कर्मचारी हे रेल्वे, बसने प्रवास करतात. त्यांना त्या सेवांचा वापर करताना संबंधित प्रशासनाकडून सहकार्य व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
























































