
नगर जिल्ह्याला निधीची कमतरता नाही, 14 आमदारांचा 14 कोटींचा निधी तसेच जिल्हा नियोजनाच्या निधी वापरण्यास परवानगी दिलेला आहे, तुम्ही त्यातून कायमस्वरूपी आरोग्य सुविधा व उपाययोजना कशा करता येईल यासाठी प्रयत्न व निर्णय घ्या. नगरचे जिल्हा रुग्णालय हे पुण्या, मुंबईच्या धर्तीवर कशा पद्धतीने परिपूर्ण करता येईल, अशी व्यवस्था करा अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
गुजरात, मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश यांचे सध्या काय हाल होत आहेत हे आता सर्व देश बघत आहे. महाराष्ट्राने मात्र कोणते आकडे लपवलेले नाही असे थोरात यांनी सांगितले दरम्यान, भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी नैराश्यातून टीका केली आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
थोरात म्हणाले की, जिल्ह्याला निधीची कमतरता नाही. जिल्हा नियोजन तसेच आमदार निधीतून आता कोविडसाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी आपल्याला ऑक्सीजन प्लांट उभे करता येतील का या दृष्टिकोनातून त्या निधीचा वापर करावा तसेच जिल्हा रुग्णालयाची अवस्था पाहता पुण्याच्या ससून व संभाजीनगरचे घाटी रुग्णालयाची जी सेवा आहे, ती अत्यंत चांगली आहे. त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यातील आरोग्याची सेवा देता येईल का त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा अशा सूचना आजच्या बैठकीत दिल्या.
नगर जिल्ह्यामध्ये कर्जत व पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय, श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय व संगमनेर ट्रॉमा केअर सेंटर तसेच नगर जिल्हा रुग्णालय आदी ठिकाणी हवेतून ऑक्सिजन मिळवण्याचे व प्रत्येकी 225 सिलेंडर क्षमतेचे ऑक्सीजन प्लांट नवीन उभारण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे तसेच नगरच्या एमआयडीसीमध्ये प्लांट मध्ये निर्माण होणारा ऑक्सिजन आपल्याला उपलब्ध होणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.




























































