लोटे औद्योगिक वसाहत पुन्हा स्फोटाने हादरली, एम.आर. फार्मा कंपनीत स्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली. एम. आर. फार्मा केमिकल कंपनीत स्फोट झाला असून ही घटना सकाळी सक्वा अकराच्या सुमारास घडली. कंपनीमध्ये केमिकल प्रक्रीया सुरु असताना हा स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्फोटाची माहिती मिळताच खेड नगरपालिका आणि औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाच्या गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. यामध्ये कोणतीही जीवितहानी नसुन, मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

एम. आर. फार्मा केमिकल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी एफबीडी या मटेरियलचे उत्पादन करते. यास मटेरियलचे मिश्रण करण्याचे काम सुरू असतानाच सदर मटेरियलने पेट घेतला. त्यावेळी संपूर्ण प्लांट चारही बाजूंनी बंद असल्यामुळे या बिल्डिंगमधून आगीला बाहेर जाण्यास मार्ग मिळत नसल्याने येथे स्फोट झाले. आग लागल्यानंतर कंपनीत काम करणाऱया कामगारांनी कंपनी आवाराबाहेर धाव घेतली. यावेळी कंपनीत दोन महिला कर्मचाऱयांसह एकूण एकवीस कामगार काम करत होते तर ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे तीन कामगार काम करत होते. मात्र कुणालाही इजा झाली नाही.

मटेरियलचा साठा आग विझवण्यासाठी ठरतोय अडथळा

रविवार 18 एप्रिल रोजी येथील समर्थ इंजिनिअरिंग कंपनीमध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला कंपनी आवारात सगळीकडे मटेरियल भरून ठेवलेल्या ड्रमामुळे घटनास्थळापर्यंत पोचण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना पोहोचण्यात अडथळा निर्माण झाला होता. तशीच परिस्थिती अग्निशमन दलालाच्या जवानांसमोर आज निर्माण झाली होती.

लोटे एमआयडीसी धुमसतेय…

लोटे एमआयडीसीमधील अपघाताची सहावी घटना आहे. मागील महिन्यात 20 मार्च रोजी घरडा केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात 4 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता तर 3 जण जखमी झाले होते. तसंच इथल्याच प्लॉट नंबर 15 येथील श्री समर्थ इंजिनिअरिंग केमिकल कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला होता तर सात जण गंभीररित्या जखमी झाले होते.