मनतरंग – मन चिंती ते वैरी न चिंती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिव्या नेरूरकर-सौदागर

‘चिंता’… आपल्या मनात असणारी एक अत्यंत मजेशीर अशी भावना… जी बऱयाच वेळा आपला आणि आपल्याबरोबर दुसऱयाचाही भविष्यकाळ पाहत असते… बऱयाचदा तो भविष्यकाळ नकारात्मक आणि सोडवण्यास अशक्य असा करून टाकते. अतिविचार हेच चिंतेचे मूळ कारण आहे.

आपल्या सर्वांना या ओळीचा अनुभव गेले कित्येक दिवस येत असेलच. आताची वेळ आणि परिस्थिती आपण कधीही अनुभवली नव्हती. 24 तास आपण सतत एकाच गोष्टीचा विचार करून आपल्या तसंच आपल्या घरच्यांचीही काळजी घेत आहोत. कित्येकांच्या मनाची स्थिती ही दोलायमान झालेली आहे. आपण करतोय ते योग्य की अयोग्य? चूक तर होणार नाही ना? नक्की हे आणि असंच करू नं? असे असंख्य प्रश्न सध्या उपस्थित झालेले आहेत. पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधून काढायची आहेत. तीही दिवसातला थोडा वेळ स्वतःला देऊन. आताची परिस्थिती आव्हानात्मक आहे; पण तिच्यातून मार्ग काढणं अशक्य मात्र नाही. म्हणूनच आपल्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही तेवढीच काळजी घेणं हे MUST झालेलं आहे.

गेल्याच आठवडय़ात मी ‘चिंतेचे व्यवस्थापन’ या विषयावर एक online कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात सहभागी झालेल्या सगळ्यांनी खाजगी आयुष्यातील काही चिंता सांगत सध्याच्या परिस्थितीबद्दलही त्यांना वाटत असलेली भीती आणि चिंता मनमोकळेपणाने सांगितली. त्यांच्याशी बोलताना मला प्रकर्षाने जाणवलं की, चिंतेतून उत्पन्न झालेल्या भीती, राग आणि तत्सम भावना या असहाय्यतेतून जन्माला येत होत्या आणि त्या सरतेशेवटी हतबलता जन्माला घालत होत्या.

‘चिंता’… आपल्या मनात असणारी एक अत्यंत मजेशीर अशी भावना… जी बऱयाच वेळा आपला आणि आपल्याबरोबर दुसऱयाचाही भविष्यकाळ पाहत असते… बऱयाचदा तो भविष्यकाळ नकारात्मक आणि सोडवण्यास अशक्य असा करून टाकते. ‘अतिविचार हे चिंतेचे मूळ कारण आहे.’ कारण यात तयार होणारे विचार हे थेट शेवटची (बऱयाच वेळा नकारात्मक) पायरी गाठतात आणि आपल्याला ‘आपण आता काही करूच शकत नाही’ अशा स्थितीत आणून ठेवतात. हे सर्व आपल्याच मनाने ठरवलेलं असतं आणि निकालही लावलेला असतो. मग प्रत्यक्ष करण्याची वेळ येते तेव्हा आत्मविश्वास थोडा कमी पडायला लागतो. हो नाही करत कामं केली जातात किंवा जात नाहीत आणि मग हे पुढे वाढत जाऊन कित्येकांना ताणतणाव, नैराश्य येऊ शकतं. साध्या सरळ शब्दांत सांगायचं झालं तर चिंता ही आपल्या मनाने तयार केलेली अशी भावना आहे जी फक्त ‘का, कसं होणार?’ हे प्रश्न निर्माण करते; पण त्याची उत्तरं देऊ शकत नाही. आपल्याला उत्तरं हवी आहेत!!

आता ही उत्तरं शोधायची कशी? आपल्याला चिंता पूर्णपणे आपल्या आयुष्यातून घालवता येईल का? आपल्याला पूर्णपणे तणावमुक्त होता येईल का? हे आणि असे प्रश्न मला माझ्याकडे समुपदेशनासाठी आलेल्या लोकांकडून बऱयाचदा विचारले जातात. माझेही उत्तर ‘नाही’ असेच असते.

आपण जर आपल्याच आयुष्यातून या भावना काढून टाकल्या तर आपल्या आयुष्याचा चार्मच निघून जाईल. आपण आपल्या आयुष्यात प्रगतीच करू शकणार नाही. आपल्याला या भावनाही जपायलाच हव्यात. कारण उद्याची (थोडीफार) चिंता आणि (थोडाफार) ताण असेल तरच आपण काहीतरी प्रयत्न करू, प्रगती करू शकू. गरज आहे ती फक्त आपण या भावनांकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची. जास्तीत जास्त सकारात्मक होण्याची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ‘समजून घेण्याची.’

जेव्हा आपण येणाऱया गोष्टींकडे अडचण म्हणून पाहतो तेव्हा आपल्याला त्या सोडवण्यास अशक्य वाटायला लागतात. पण त्याच गोष्टी जेव्हा संधी म्हणून पाहतो तेव्हा त्या आपोआप सोडवण्यास शक्य बनत असतात.

जेव्हा आपण सतत चिंता किंवा तणावाखाली राहतो तेव्हा या भावना वाढीस लागून नैराश्याचे रूप धारण करतात. याउलट जर या भावनांच्या व्याख्याच जर बदलल्या तर त्या आपल्यासाठी सुसह्य होतील.

चिंता जेव्हा काळजी म्हणून पाहिली जाते तेव्हा ती आपल्याला जबाबदार बनवते. ज्यामुळे आपसूकच येणारा ताण हा नैराश्यात न बदलता आपल्याला सजग बनवतो. ‘काळजी’ ही चिंतेचे छोटे असे स्वरूप आहे ज्यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात फारसा फरक पडत नाही. काळजी असेल तर आपण कुठलाही निर्णय घेताना जास्तीत जास्त व्यवस्थित आणि अचूकपणे घेऊ लागतो. यासाठीच मनाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. मनाची काळजी म्हणजेच आपल्या विचारांची काळजी घेणं. कारण आपले विचारच आपल्यात विविध भावना उत्पन्न करत असतात.
जी व्यक्ती जास्तीत जास्त (Overthinking) नकारात्मक विचार करते ती व्यक्ती आयुष्याबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार करत असते. याउलट जी व्यक्ती जास्तीत जास्त सकारात्मक विचार करते ती आपल्या समस्या (शारीरिक आणि मानसिक) अधिकाधिक सक्षमपणे हाताळू शकते. तिच्यात असलेला सकारात्मक दृष्टिकोन हा तिला परिस्थितीशी दोन हात करायला शिकवत असतो. भावना हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे जे आपल्याला अतिशय जागरूकपणे वापरायची गरज आहे. जसा आयुष्यात आनंद आहे तसे दुःखही असणारच आहे. राग, चिंता याही भावना असणारच आहेत. पण या वरवर नकोशा वाटणाऱया भावना सहज सुकर आपणच करू शकतो.

आपण अनुभवत असलेली सद्य परिस्थिती असो किंवा वैयक्तिक असो. तिला नाकारून किंवा दुर्लक्ष करून, तिचा अतिविचार करून किंवा बेफिकीर राहून ती बदलता येणार नाही. मात्र ती सोडवता येऊ शकेल. त्यासाठी आपल्यात काही बदल करणं गरजेचं आहे.

1. स्वतःशी संवाद साधणं. आपल्यात असलेल्या तमगुणांचा अभ्यास करणं, त्यांना स्वीकारणं आणि त्यांच्यावर काम करणं.
2. आयुष्यात जमेल तितका नियमितपणा आणणं.
3. गरज भासल्यास दुसऱया जबाबदार व्यक्तीशी संवाद साधणं.
4. योग साधना.
5. स्वतःसाठी वेळ काढणं.

आणि याउप्पर जर मनाची घालमेल संपत नसेल तर तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणं.
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)

– [email protected]