
मल्याळम भाषेतील ‘दृश्यम-2’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. अजय देवगण याचा जवळचा मित्र, निर्माता कुमार मंगत याच्या पॅनोरोमा स्टुडिओ इंटरनॅशनलने या चित्रपटाचे हिंदी राईट खरेदी केले आहेत. लवकरच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि चित्रपटातील कलाकारांच्या नावांची घोषणा होऊ शकते.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती ट्विटरवर दिली आहे. मल्याळम ‘दृश्यम-2’चे दिग्दर्शक जितू जोसेफ यांनी म्हटलं की, ‘‘आम्हाला खूप आनंद आहे या चित्रपटाची कथा आणखी प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’
2013 साली आलेल्या मल्याळम ‘दृश्यम’ चित्रपटाचा बॉलिवूडमध्ये 2015 साली रिमेक आला होता. त्यात अजय देवगण, श्रेया सरण, तब्बू यांच्या मुख्य भूमिका होत्या.


























































