
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याचे नाव घेत नसून अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवावरून यंदा ट्रेन, बस अशा वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या नसल्या तरी देखील यासेवा अत्यावश्यक सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठीच सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त एखाद्या व्यक्ती किंवा कुटुंबाला प्रवास करायचा असल्यास ई-पासची सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यांना अत्यंत गरज आहे अशा व्यक्तींसाठी ही सेवा देण्यात आली असताना देखील लोक विविध कारण देऊन ई-पासची मागणी करत असल्याचं बिहारमध्ये समोर आलं आहे. पूर्णिया भागातील जिल्हाधिकारी राहुल कुमार यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
बुधवारी जिल्हाधिकारी राहुल कुमार यांनी ट्वीट करून लिहिले आहे की लॉकडाउनमध्ये प्रवासाच्या परवानगीसाठी अनेक अर्ज येतात. बऱ्याचदा त्यांची कारण योग्य असतात. मात्र काही लोक परिस्थितीचं भान न ठेवता अजब-गजब मागणी करत आहेत.
आपल्या ट्वीटमध्ये राहुल कुमार यांनी एक अर्ज जोडला आहे, ज्यामध्ये ई-पास देण्याची मागणी करण्यात आली आहे. आजाराचे कारण देताना चेहऱ्यावरच्या पिंपल्सवर इलाज असे देण्यात आले आहे. यावर राहुल कुमार यांनी लिहिले आहे की, ‘भाई तुझे पिंपल्स उपचारासाठी थोडी आणखी वाट पाहू शकतील.’
Maximum applications we receive for issuance of E-Pass during #lockdown are genuine but then we receive these kind of requests as well. Brother, your pimples treatment may wait. #Priorities pic.twitter.com/p9YD40InN4
— Rahul Kumar (@rahulias6) May 5, 2021
बिहारमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारच्या जनतेला आवाहन केले होते की राज्याची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी असा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी नियमांचे काटकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
बिहारमध्ये गेल्या 24 तासात 14 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील सव्वा लाख पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बिहारची स्थिती गंभीर होत चालली असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडला आहे.




























































