
नाशिक जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी बुधवारी, 12 मे रोजी दुपारी बारा वाजेपासून 23 मेच्या मध्यरात्री बारापर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. या काळात केवळ लसीकरण, वैद्यकीय व आरोग्य संबंधित आस्थापना सुरू असतील. किराणा, दूध यांची फक्त होम डिलीव्हरी करण्यात येणार आहे.
जिह्यातील कोरोना रुग्णसंख्या बघता कठोर पावले उचलावी, अशी भूमिका नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही मांडल्याचे पालकमंत्री म्हणाले. 12 मेच्या दुपारी बारापासून 23 मेच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत लॉकडाऊन कडक राहील. नागरिकांनी याला 100 टक्के पाठिंबा दिल्यास आपण कोरोनाचा लढा नक्की जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त कैलास जाधव व सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. त्यात हा कठोर लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व बाजार समित्या बंद राहणार
या लॉकडाऊन काळात जिह्यातील सर्व बाजार समित्या बंद असतील. शेतकऱयांचे नुकसान होऊ नये म्हणून समिती प्रशासनाद्वारे विकेंद्रीत पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.
असे असतील निर्बंध
लसीकरण, चाचणी सुविधा, वैद्यकीय व आरोग्य यांच्याशी संबंधीत आस्थापना सुरू राहतील. दूध संकलनासाठी सायंकाळी देखील वेळ दिलेला आहे. कारखाने, बांधकामे मोजक्याच कामगारांची निवास व्यवस्था, लसीकरण करून सुरू ठेवता येईल. अंत्यविधीसाठी पूर्वीप्रमाणे 20 जण, नंतरच्या विधींना 15 व्यक्ती इतकी मर्यादा राहील. अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल व डिझेल देण्याचे नियोजन करण्यात येणार असून, परिवहन व पोलीस दल यांना हा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
फक्त वैद्यकीय कारणासाठीच नागरिकांना घराबाहेर पडता येईल. किराणा, बेकरी दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत होम डिलीव्हरी देता येईल. नागरिकांना या दुकानांमध्ये येता येणार नाही. भाजी बाजार बंद असतील. रस्त्याच्या कडेला सुरक्षित अंतरावर व्यवस्था करून भाज्या, फळांची सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत विक्री करता येईल. दूध देखील याच वेळेत घरपोच देता येईल.
लग्न केवळ पाच जणांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह नोंदणी कार्यालयात करता येईल.





























































