
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळील ‘हिमालय’ पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला होता. या ठिकाणी पालिका आता स्टेनलेस स्टीलचा मजबूत पूल बांधत आहे. यासाठी 5 कोटी 53 लाखांचा खर्च केला जाणार आहे. स्टीलच्या बांधकामामुळे गंजण्याचा धोका टळणार असून खाऱ्या हवेचा परिणामही होणार नसल्याने पूल मजबूत राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
अंधेरीत जुलै 2018 रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व रस्त्यावरील पूल, उड्डाणपूल, रेल्वे आणि पादचारी पुलांचे पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने हाती घेतले आहे. मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविड रोखण्यासाठी काम करीत आहे. मात्र कोरोना लढय़ातही रस्ते, पूल आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कामेही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. यामध्ये महत्त्वाचे काम म्हणजे पुलांची दुरुस्ती आणि नव्या पुलांचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या मोहिमेत कोसळलेला हिमालय पूल पालिकेच्या माध्यमातून नव्याने बांधण्यात येणार आहे. या पुलाची मजबुती वाढविण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी होणाऱया स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाणार आहे.
15 महिन्यांत काम पूर्ण होणार
हिमालय पूल 28.50 मीटर लांबीचा आणि 4.40 मीटर रुंदीचा बांधला जाणार आहे. या पुलाचे स्ट्रक्चर स्टीलचे बांधण्यात येणार आहे.जेणेकरून समुद्राच्या खाऱ्या हवेने पुलाचे बांधकाम खराब होणार नाही. या पुलासाठी 6 कोटी 38 लाखाचे अंदाजपत्रक तयार करून निविदा मागवल्या होत्या. तर पिनाकीन इंजिनीअर्स आणि डेव्हलपर्स या कंपनीने 5 कोटी 53 लाख रुपयांत काम करण्याची तयारी दाखवली आहे.त्यानुसार सर्व करानुसार 6 कोटी 3 लाख रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात येणार आहे. कार्यादेश मिळाल्यानंतर पावसाळा वगळता 15 महिन्यांत हे काम पूर्ण करायचे आहे.


























































