राज्यात कोवॅक्सिन लसीचे उत्पादन वाढणार! पुण्यात बायोटेक कंपनीला 12 हेक्टरचा भूखंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bharat-biotech-covaxin

घातक कोविड विषाणूपासून बचाव करणाऱया कोवॅक्सिन लसीचे उत्पादन महाराष्ट्रात उत्पादन लवकरच वाढणार आहे. भारत बायोटेकची सहाय्यक कंपनी असलेल्या बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पुण्यात कोवॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी 12 हेक्टरचा भूखंड देण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे. ही परवानगी देतानाच भूखंडाचा ताबा राज्य सरकारने तत्काळ द्यावा, असे आदेशही खंडपीठाने शासनाला दिले.

पुण्यातील मांजरी खुर्द येथील भूखंड परदेशातील इंटरवेट इंडिया या कंपनीला पाय व तोंडाच्या विकारांवर लस निर्मितीसाठी 1973 साली देण्यात आला होता. इंटरवेट कंपनीने पुण्यातून गाशा गुंडाळल्यानंतर कर्नाटकातील बायोवेट या कंपनीला ही जागा देण्यासंदर्भात करार केला. जागा हस्तांतरांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसून ती जागा वन विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचा दावा वन विभागाने केल्यामुळे बायोवेट कंपनीने या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी युक्तिवाद करताना कोर्टाला सांगितले की, कंपनीला जीवरक्षक लस निर्मितीसाठी नक्कीच परवानगी दिली जाईल; पण कंपनीने त्या जागेवर कायमस्वरूपी ताबा घेण्याचा विचार करू नये.