
शहरात विनामास्क फिरणाऱ्या बेशिस्तांविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी पोलिसांनी बडगा कायम ठेवला आहे. त्यानुसार विविध चौकासह सिग्नल आणि नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 3 लाख 54 हजार 969 जणांविरूद्ध कारवाई केली आहे. त्यानुसार 17 कोटी 85 लाखांची वसुली केली आहे. पोलिसांकडून वारंवार आवाहन करुनही नागरिक विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
शहरात दररोज सरासरी दोन ते तीन हजारांवर विमानास्क नागरिकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार पोलिसांना मागील वर्षभरात तब्बल 3 लाख 54 हजारांवर बेशिस्त नागरिकांकडून 17 कोटी 85 लाखांची वसुली करण्यात आली आहे. अनेकांकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन, विनामास्क प्रवास, सॅनिटायझरचा वापर न करीत सर्रासपणे आरोग्य विभागाच्या सूचनांचे उल्लंघन केले जात आहे. त्यानुसार विनामास्क फिरणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये दंडाच्या कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे. दरम्यान, विनामास्क कारवाई करताना पोलिस आणि नागरिकांमध्ये वादावादी होत असल्याचे दिसून आले आहे.
नागरिकांकडून सोशल डिस्टन्स न पाळणे, विनामास्क भटकंती करणे, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे पुणे शहरातील कोरोना संक्रमित रुग्णसंख्येचा आलेख वाढला आहे. त्यापाश्र्वभूमीवर विनामास्क नागरिकांवर कडक कारवाई करुन दंडवसुलीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार 2 सप्टेंबर 2020 पासून पोलिसांकडून शहरातील विविध भागात कारवाईचा दंडुका उगारण्यात आला होता. मध्यंतरी कारवाई थंडावली होती. मात्र, एप्रिल 2021 पासून शहरात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे पोलिसांकडून विनामास्क नागरिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नागरिकांकडून दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पोलिस आणि नागरिकांमध्ये वादावादी होत आहे. कारवाईपासून वाचण्यासाठी दिखाउपणे मास्कचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. मास्कचा वापर तोंडाला न करता गळ्यात घातल्यामुळे अनेकांविरूद्ध कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वसंरक्षणार्थ मास्कचा वापर केला पाहिजे. दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क न दिसल्यास कारवाई करण्याचाही इशारा पोलिसांनी दिला आहे.
”स्वसंरक्षणासह सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापरणे आवश्यक आहे. मात्र, प्रवासादरम्यान काहीजणांकडून मास्क परिधान केले जात नसल्यामुळे संसर्गाचा धोका जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध दररोज दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे”.- अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा
”विनामास्क भटवंâती कोरोनाच्या संक्रमणाला गती देत आहे. त्यामुळे स्वयंशिस्त बाळगून सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. विनामास्क फिरणाऱ्याविरुद्ध प्रत्येक चौकात पोलिसांकडून कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे.” – श्रीनिवास घाडगे पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा
विभागानुसार विनामास्क कारवाई
परिमंडळ एक – 78 हजार 137
परिमंडळ दोन- 52 हजार 761
परिमंडळ तीन – 62 हजार 121
परिमंडळ चार- 66 हजार 853
परिमंडळ पाच- 55 हजार 642
वाहतूक शाखा- 39 हजार 455























































