
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढला असून, बाधित आणि मृत्यूची संख्या चिंताजनक बनली आहे. अशा ऐनवेळीच जिह्याचा सर्वाधिक भार असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात (सीपीआर) ‘पीएम केअर’ फंडातून आलेले 61 पैकी तब्बल 26 व्हेंटिलेटर सध्या बंद पडल्याने सीपीआरवर कमालीचा ताण आला आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून संबंधित कंपनीकडून कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने ही बोगस कंपनी असल्याचे समोर येऊ लागले आहे. या बंद पडलेल्या व्हेंटिलेटरचे सुटे भाग मिळत नाहीत. उर्वरित व्हेंटिलेटरही कधीही बंद पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून जिह्याला पीएम केअर फंडामधून 61 व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र, काही दिवसांतच एक एक पार्ट निकामी होऊन आतापर्यंत तब्बल 26 व्हेंटिलेटर बंद पडले आहेत. सध्या दुसऱया लाटेत पालकमंत्री सतेज पाटील यांनी सीपीआर रुग्णालयात घेतलेल्या बैठकीत एवढय़ा मोठय़ा संख्येने व्हेंटिलेटर बंद पडल्याचे समोर आले.
उर्वरित व्हेंटिलेटरही बंद पडण्याची शक्यता
n स्थानिक तंत्रज्ञांकडून पीएम केअर फंडातून मिळालेल्या व्हेंटिलेटरपैकी काही व्हेंटिलेटरची दुरुस्ती करण्यात आली असली, तरी यातील सुटे भाग उपलब्ध नसल्याने तसेच चायनीज बनावट भाग असल्याचेही दिसून आल्याने पीएम केअर फंडातून आलेले हे उर्वरित व्हेंटिलेटरसुद्धा कधीही बंद पडण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱयांनी बोलून दाखवली.
कंपनीच्या अस्तित्वाबाबतच शंका
n सीपीआर प्रशासनासह पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुरवठादार असलेल्या बंगळुरू येथील ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी’कडे वारंवार पाठपुरावा केला. तंत्रज्ञ पाठविण्याची विनंती करण्यात आली. मात्र, अजूनही त्यांच्याकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही कंपनी अस्तित्वात आहे की नाही अशी शंका येत असून, या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.
90 ते 92 व्हेंटिलेटर सुरू
n सीपीआरमध्ये यापूर्वी 40 ते 45 व्हेंटिलेटर असून ते अजूनही सुस्थितीत आहेत. पीएम केअर फंडातून आलेल्या या 61 व्हेंटिलेटरसह विविध सामाजिक संस्थांनी दिलेले असे एकूण 113 व्हेंटिलेटर आहेत. मात्र, पीएम केअर फंडातून आलेले 26 व्हेंटिलेटर बंद पडल्याने सध्या 90 ते 92 व्हेंटिलेटर सुरू असल्याची माहिती सीपीआर प्रशासनाकडून मिळाली.































































