
>> ममता क्षेमकल्याणी
गेल्या 7-8 वर्षांपासून इडार्चमध्ये येणारा भूषण भाकरे आता इथे चांगला रुळला आहे. आधी विशेष शाळेत जाणारा भूषण भाकरे 18 वर्षांचा झाला आणि त्यानंतर त्याची शाळा बंद झाली. 12 माणसांच्या एकत्र कुटुंबात राहणारा भूषण त्याच्या कामसू वृत्तीमुळे सगळ्यांसाठी खऱया अर्थाने ‘भूषण’ ठरला आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या भूषणचे आयुष्य त्याच्या अपंगत्वामुळे आणखीनच मर्यादित झाले आहे. वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत भूषण दिवसभर शाळेत जायचा. साधारण 13 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचं निधन झाल्यामुळे एकत्र कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याच्या आईला एखादं काम करणं अपरिहार्य ठरलं. त्याची आई नंदा भाकरे या एलआयसी ऑफीसमध्ये झाडू-फरशीचं काम करतात. दिवसभर कामावर जाणारी आई भूषणला फारसा वेळ देऊच शकली नाही. त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हौशी-मौजींना त्यांच्या जीवनात स्थान असण्याचे काही कारणच नाही.
‘इडार्च’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे म्हणतात की, ‘‘अत्यंत निर्मळ मनाची, सरळ-साध्या स्वभावाची ही मुलं मला नेहमीच कामाची प्रेरणा देतात. भूषण हादेखील असाच एक निरागस स्वभावाचा मुलगा. रोज जेवण झाल्यावर स्वतःचे ताट तो घासून ठेवतो. चहा प्यायल्यानंतर कप विसळून ठेवतो, घर झाडतो. सेंटरला लवकर आला की, सगळं झाडून घेतो. देवाची पूजा करतो. घरीपण तोच देवपूजा करतो. इतर कोणी केलेली देवपूजा त्याला अजिबात आवडत नाही. रोज हरिपाठ लिहून काढतो. रोज सगळ्यांच्या आधी सेंटरला येतो आणि रोज सगळ्यांच्या शेवटी जातो. सकाळी आल्यानंतरच्या आणि घरी जातानाच्या सगळ्या जबाबदाऱया म्हणजे अगदी लाईट्स बंद करण्यापर्यंतची सगळी कामं जबाबदारीने पार पाडतो.
‘इडार्च’ला येऊन कागदी पिशव्या तयार करणे, फिनिशिंग करणे, तसंच मशीनवर जॉब तयार करणे अशी अनेक कामं भूषण अगदी उत्तम प्रकारे करतो. भूषणची आई नंदा या सात महिन्यांच्या गरोदर असताना त्यांना ताप आला होता. जन्मानंतरच्या भूषणच्या अनेक गोष्टी म्हणजे त्याचं रांगणं, चालणं, इतर मुलांप्रमाणे त्या त्या वेळेलाच सुरू झालं. मात्र तो बोलायला उशिरा लागला. आधी वडील आणि त्यांचे निधन झाल्यानंतर त्याचे आजोबा त्याला त्याच्या विशेष शाळेत नेण्या-आणण्याचं काम करीत होते. नंतर मात्र त्याची समज बरीच वाढली आणि तो एकटय़ानेच शाळेत जाऊ-येऊ लागला. शिक्षणात तो कमी पडल्यामुळे इतर मुलांपेक्षा बराच मागे राहिला. लिहायला मात्र कितीही दिलं तरी तो चांगलं लिहितो. त्याला मराठीत सगळं लिहिता येतं. वय वाढलं तसं घरातील कामं तो जबाबदारीने करायला लागला आहे. दुकानात जाऊन सामान आणणं, गिरणीत जाऊन दळण टाकणं, भाजी आणणं अशी अनेक कामं तो आवडीने करतो.
सगळ्यांची कामं ऐकणारा भूषण शांत आणि प्रेमळ स्वभावाचा आहे. तो स्वतःच्या कामात खूप व्यग्र असतो. सगळ्यांशी छान गप्पा मारतो. स्वतःची सगळी कामं स्वतः करतो. केवळ बुद्धिमत्तेच्या मर्यादेमुळे त्याचं जीवन सामान्य न राहता ‘विशेष’ झालं एवढंच.
भूषण ‘इडार्च’च्या कार्यालयापासून जवळच्याच परिसरात रहायला असल्यामुळे त्यांना संस्थेविषयीची माहिती मिळाल्यानंतर तो एकटाच येथे येऊ लागला. इथे कोणी नवीन लोक आहेत वगैरे अशी कसलीच भीती किंवा संकोच त्याला वाटला नाही. इथे कधी कोणतंही काम राहिलं तरी ते तो पूर्ण करूनच घरी जातो. काम अर्धवट सोडून घरी जाणं त्याच्या स्वभावातच नाही. बरेचदा घरी ये, असं सागण्यासाठी त्याच्या आईला फोन करावा लागतो, इतका तो इथे रमला आहे. स्वावलंबी होण्याचा प्रयत्न तो कायमच करत आला आहे. नवीन गोष्टी शिकायची त्याला खूप आवड आहे. मुख्यतः तांत्रिक गोष्टी शिकण्याकडे त्याचा कल जास्त असतो. फोन, मोबाईल, कॅमेरा, यांची सगळी माहिती त्याला आहे. त्याला विठ्ठलाची गाणी ऐकायला खूप आवडतात. त्याच्या मोबाईलमध्ये विठ्ठलाची चिक्कार गाणी आहेत. ‘मी माळकरी आहे,’ असं तो मोठय़ा अभिमानाने सांगतो. पहिल्यापासून त्याला पांडुरंगाचंच वेड आहे. आमच्या घरातले सगळेच मांसाहार करतात, पण तो अजिबात मांसाहार करत नाही. भूषणला विठ्ठलाने कधी आणि कसा दृष्टांत दिला, हे मला ठावूक नाही; पण अगदी कळत्या वयापासून तो विठ्ठलाचा भक्त झाला असून कधीच मांसाहार करीत नाही, हे सांगताना भूषणच्या आईच्या चेहऱयावर लेकाविषयीचा अभिमान झळकून जातो.
‘ईडार्च’ला आल्यानंतर भूषणच्या वागण्या-बोलण्यापासून अनेक गोष्टींमध्ये खूप बदल आणि सुधारणा झाली. बसचा पास काढायला वगैरे स्वारगेटला तो एकटाच जातो. ‘‘तू अजिबात काळजी करू नको, मला सगळं माहीत आहे. मी व्यवस्थितपणे जाऊन येईन,’’ असा दिलासा तो त्याच्या आईला देतो. घर जवळ असल्याने दुपारी साधारण एक-दीड वाजता तो जेवायला घरी जातो. मात्र घडय़ाळाचा काटा दोनवर येताच दुसऱया मिनिटाला तो इडार्चमध्ये हजर होतो. रोज सकाळी काय किंवा जेवण झाल्यानंतर दुपारी काय त्याच्या इडार्चला येण्याच्या या दोन्ही वेळा तो अगदी काटेकोरपणे पाळतो. त्या वेळांमध्ये कोणी कोणत्याही कारणाने उशीर करायला सांगितला, तर ते त्याला अजिबात चालत नाही. मात्र याच भूषणला संध्याकाळी अरे बाबा आता घरी जा, असं दोनदा-तिनदा सांगावं लागतं. कधीतरी एखाद्या महत्त्वाच्या कारणामुळे इडार्चमध्ये यायला उशीर होत असेल, तर तो उशिरा येणं टाळतो. त्याला उशीर झालेला अजिबात चालत नाही. वेळेचा फारच पक्का आहे तो. भूषणच्या आई नंदाताई म्हणतात की, ‘‘मी माझ्या मुलाला एका जबाबदार आणि विश्वासू हातांकडे सुपूर्द केल्याचे समाधान मला आहे. इथे तो त्याच्या कामात दिवसभर चांगला रमत असल्याने तिकडे मलादेखील माझ्या कामावर कोणतेच टेन्शन राहत नाही. कारण त्याचं वय वाढलं तसं त्याला इतर काही चांगल्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, अशी माझी इच्छा होती. कारण त्याच्या विशेष शाळेत जाण्याचं वयदेखील संपल्याने तो नंतर घरी बसून काय करेल, ही चिंता मला सतावत होती. इथले वातावरण खूप सुरक्षित असल्याने त्याच्या बाबतीत इतर कोणत्याच गोष्टींचीदेखील मला काळजी राहिलेली नाही.’’
नंदाताई व्यक्त करीत असलेला हा विश्वास ‘इडार्च’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. दिलीप देशपांडे यांना खूप उभारी देणारा आहे.
इडार्चच्या माध्यमातून आपल्या कुटुंबातील किंवा परिचयातील दिव्यांग व्यक्तीचे खऱया अर्थाने पुनर्वसन करण्यासाठी संपर्क करा.



























































