
लॉकडाऊनमुळे देशातील दूध पावडर आणि बटर बेचव झाले आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने दुधाच्या मागणीत 25-30 टक्क्यांची घट झालेली असतानाच गेल्या तीन महिन्यांपासून दूध पावडर आणि बटरची निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 270 रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणारी दूध पावडर 130 रुपयांपर्यंत खाली घसरली आहे, तर बटरचा दर 360 रुपयांवरून 210 रुपयांपर्यंत खाली आला आहे. याच्या झळा दूध उत्पादकांबरोबरच पावडर उत्पादकांना बसू लागल्या आहेत.
देशात पाऊच पॅकिंगबरोबरच दही, ताक, लस्सी यासह उत्पादनांकरिता दूध वापरल्यानंतर शिल्लक राहणाऱया दुधापासून दूध पावडर आणि बटर तयार केले जाते. त्यानुसार वर्षाला देशात जवळपास दोन लाख मेट्रिक टन दूध पावडर आणि 90 हजार टन बटरची निर्मिती केली जाते. त्यापैकी 2018-19 या आर्थिक वर्षात 1 लाख 25 हजार मेट्रिक टन तर 2019-20 मध्ये एक लाख मेट्रिक टन दूध पावडर इराण, इराक, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, ओमानसह आफ्रिकन देशांना निर्यात केली होती. 2020-21 मध्ये कोरोना महामारीच्या सुरुवातीला जगभरात लॉकडाऊन असल्याने दूध पावडर आणि बटरची निर्यात ठप्प झाली होती. पण लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच सप्टेंबरपासून मार्चपर्यंत जवळपास 65 हजार टन दूध पावडर आणि 42 हजार टन बटरची निर्यात केली होती. तेव्हा प्रतिकिलो दूध पावडरीचा दर 270 रुपये तर बटरचा दर 350 रुपये होता. मात्र देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने दूध पावडर आणि बटरची निर्यात ठप्प झाल्याचे महानंद डेअरीच्या असेप्टिक विभागाचे प्रमुख आर. के. पाटील यांनी सांगितले.
पावडर निर्मिती ठप्प झाल्याने अतिरिक्त दुधाचा प्रश्न
राज्यात दररोज जवळपास 1 कोटी 20 लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. त्यापैकी 1 कोटी 10 लाख लिटर दुधाचे वितरण होते, तर उर्वरित दुधाची पावडर तयार केली जाते, मात्र सध्या दुधाच्या मागणीत 25 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. त्यामुळे जवळपास 25-30 लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. त्यातच दुधाच्या पावडरीलाही दर नसल्याने पावडर उत्पादकांनी पावडर निर्मिती थांबवल्याने राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न उभा राहिला आहे.























































