
कोरोनामुळे सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला आहे. देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बोर्डाने शाळांना अंतर्गत मूल्यमापन करून निकाल तयार करण्यासाठी आणखी 25 दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे निकाल लांबणीवर गेला असून आता जुलैमध्येच निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालाविषयी सीबीएसई बोर्डाने परिपत्रक जारी केले असून त्यात 20 जूनला दहावीचा निकाल जाहीर होणार नाही असे म्हटले आहे. शाळांना निकाल तयार करून तो वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी 25 दिवसांचा अतिरिक्त वेळ दिला आहे. आता शाळा 30 जूनपर्यंत बोर्डाकडे निकाल पाठवू शकतात. त्यानंतरच निकाल जाहीर केला जाईल. शाळांना निकाल पाठविल्यानंतर बोर्डाकडून तो जाहीर होण्यास 5 ते 7 दिवसांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे निकाल जाहीर होण्यास जुलै उजाडेल.



























































