
कोरोना चाचणी करण्यासाठी आरटीपीसीआर पिंवा रॅपिड अँटिजेन टेस्टचा वापर केला जातो. पण नागपूरच्या ‘निरी’ अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्राने नवीन पर्याय शोधून काढलाय. या संशोधनानुसार तुमच्या थुंकीद्वारे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोरोना चाचणी करण्यासाठी नाकातून पिंवा तोंडातून स्वॅब घेण्याची गरज लागणार नाही.
याआधी अनेक नागरिकांना नाकावाटे व घशावाटे नमुने देताना इजा झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. अनेकांना नाकावाटे किंवा घशावाटे नमुने देताना हायपर टेन्शनचा त्रास होत होता तो त्रास यापुढे बंद होणार आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) ने कोविड टेस्टिंगसंदर्भात केलेले हे संशोधन महत्त्वाचे व उपयुक्त मानले जात आहे. ‘निरी’च्या या संशोधनाला आयसीएमआरने मान्यता दिली आहे.
वेळ आणि खर्चाची बचत
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांचा रिपोर्ट येण्यास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागत आहे. अशा वेळी पॉझिटिव्ह आल्यास रुग्णांना उपचार घेण्यास उशीर होत आहे. अनेक रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने जीवही गेलाय. ‘निरी’ संस्थेने दिलेल्या या पर्यायामुळे तीन तासांत कोरोना चाचणीचा अहवाल मिळेल आणि खर्चाची बचत होणार आहे.
या चाचणीचे स्पॅम्पल ‘आरएनएन एक्सट्रक्शन’ही करण्याची आता गरज नाही. त्यासाठीसुद्धा ‘निरी’ने एक विशिष्ट द्रव्य तयार केले आहे. या द्रव्याच्या आधारे कमी वेळात तपासणी पूर्ण होते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेसुद्धा ‘निरी’च्या या तंत्राला मान्यता दिली आहे. परिषदेने ‘निरी’ला देशातील इतर महत्त्वाच्या प्रयोगशाळांनासुद्धा या तंत्राचे प्रात्यक्षिक देण्याच्या सूचना केल्या आहेत. – डॉ. क्रिष्णा खैरनार, व्हायरॉलॉजी विभागप्रमुख, निरी
देशभरातील पाचशे लॅबमध्ये सुरुवातीला या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमध्ये चाचणीसाठी लोकांना रांगेत लागण्याची गरज नाही. शिवाय वेळही वाचेल आणि संसर्ग होण्याचाही धोका कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर ही पद्धत अमलात आणल्यास चाचण्या सुलभ आणि सुकर होण्यास मदत होईल, असे या संस्थेकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना चाचणी करणाऱया व्यक्तीला सलाईन पाणी दिले जाईल. या व्यक्तीने 15 सेकंदांसाठी संपूर्ण घशातून गुळणी करणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील 15 सेकंद चूळ भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर हे पाणी त्या व्यक्तीने एका ‘व्हेसल’मध्ये थुंकावे लागणार आहे. हेच पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहे.






























































