बीज अंकुरे अंकुरे, बीजगोळे बनवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात’

कवी मधुकर आरकडे यांच्या कवितेच्या या दोन ओळी नवनिर्मितीचे अंपुर मनात रुजवतात. ओल्या मातीत बीज रुजवायचं तर त्याची निगराणी करावी लागते, त्यावर मायेची पाखर घालावी लागते. जंगलात नुसत्या बिया फेकून उपयोगाचे नाही. त्या बिया रुजतीलच याची शाश्वती नसते. पक्षी, प्राणी आणि कीटक त्या खातात. काही सुकून जातात, काही पाण्यात पडतात. यावर तोडगा म्हणून अलीकडच्या वर्षांमध्ये बीजगोळे (सीडबॉम्ब) तयार करण्याची संकल्पना राबवली जात आहे. या वर्षी प्रत्यक्ष ‘फिल्ड’वर जाऊन उपक्रमाची अंमलबजावणी शक्य नाही, मात्र तरीही ऑनलाईन माध्यमाचा वापर करून पर्यावरणप्रेमींना जोडून घेण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.

पर्यावरणाविषयी जागृती व्हावी म्हणून शाळा, संस्थांमध्ये बीजगोळे तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. अक्षर मानव संघटना दरवर्षी शाळांमध्ये बीजगोळे उपक्रम राबवते. यंदा कोरोना काळात संघटनेने बीजगोळे तयार करण्याचे फोटो, व्हिडियो पाठवण्याचे आवाहन केले आहे. याविषयी अक्षर मानव संघटनेचे राज्य पर्यावरण विभागप्रमुख अरुण मापारी म्हणाले, बीजगोळ्यांबाबत लोकांना आता माहिती झालेय. मात्र अधिकाधिक जागृती होणे गरजेचे आहे. बीजगोळे तयार करण्याचे वर्पशॉप घेणार होतो. मात्र लॉकडाऊनमध्ये शक्य नाही. प्रथमच ऑनलाईन स्पर्धा घेतोय.

कोणत्या बिया वापराव्यात

जमवलेल्या बिया चांगल्या दर्जाच्या, चांगल्या पिकून सुकलेल्या, कीड न लागलेल्या असाव्यात. चिंच, आंबा, बोर, कडुलिंब, जांभूळ, सीताफळ, करंज अशा विविध देशी झाडांच्या बिया जमा कराव्यात.

  • बीजगोळे माळरान, मोकळ्या जागेत फेकू नयेत. कारण फेकण्याने बीजगोळ्यांचे नुकसान होते आणि गोळे फुटतात. बिया इकडेतिकडे पडतात. जरी रोपं आली तर किती जगतील याची शाश्वती नाही. म्हणून बीजगोळे काटेरी झुडपांच्या खाली मध्यभागी ठेवले तर 80 टक्के जगण्याची जास्त शक्यता असते. कारण या झुडपांच्या काटय़ांमुळे रोपाला सुरक्षा मिळते. तसेच काटेरी झुडुप असेल तर खाली ओलावा असतो. ही परिस्थिती बीजगोळ्यातून रोप येण्यासाठी पूरक असते.
  • बीजगोळ्यांमधील माती आणि शेणाचे मिश्रण एक वर्षभर त्या रोपाला जगवतं. अगदी दुसरा पावसाळा येईपर्यंत रोपं जगू शकतात, अशी माहिती अरुण मापारी यांनी दिली.

‘सीड’बॉम्ब कसा बनवाल…

बीजगोळे बनवण्यासाठी माती, शेण, पाणी आणि बिया एवढेच साहित्य लागते. माती व शेण एकत्र करून त्यात पाणी घालून घट्ट मिश्रण करा व त्यात बिया ठेवून त्याचे साधारण लाडूसारखे गोळे बनवा. मोठय़ा बिया असल्यास दोन-तीन बिया, छोटय़ा असल्यास पाच-सहा बिया ठेवाव्यात. हे गोळे सावलीमध्ये सुकवायला ठेवा. जूनमध्ये पहिला पाऊस पडल्यावर मोकळ्या जमिनींवर, माळरानांवर, रस्त्याच्या कडेला, काटेरी झुडूप बघून त्याच्या तळाशी हे बीजगोळे ठेवा.