अखेर सात दिवसांनी बार्ज सापडला! रायगड किनारी 8, वलसाडमध्ये आणखी 2 मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’ चक्रीवादळाच्या तडाख्याने 261 कर्मचाऱयांसह बुडालेले ओएनजीसीचे पी-305 हे बार्ज सात दिवसांनंतर रविवारी पहाटे आयएनएस मकरच्या साईड स्कॅन रडारने शोधून काढले. बुडाल्याच्या ठिकाणावरून खोल समुद्रतळाशी ते सापडले. दरम्यान, आज रायगडच्या 3 वेगवेगळय़ा समुद्रकिनारी 8 जणांचे तर वलसाड येथील समुद्रकिनारी 2 मृतदेह सापडले आहेत. मात्र, हे मृतदेह बार्जमधले कर्मचारी आहेत का, वरप्रदा बोटीतील आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, वरप्रदा बोटीचा शोध लागला नसून त्यावरील 11 जण अजूनही बेपत्ता आहेत.

‘तौकते’ चक्रीवादळामुळे ओएनजीसीच्या हीरा तेल विहिरीसाठी काम करणारे पी-305 बार्ज सोमवारी संध्याकाळी 5 वाजता बुडाले. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाची पर्वा न करता नौदलाने अतिशय खडतर अशा परिस्थितीत अचाट कामगिरी करत शुक्रवारपर्यंत बार्जवरील 188 जणांना वाचवण्यात यश मिळवले तर शनिवारपर्यंत राबवलेल्या शोधमोहिमेत 66 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण बेपत्ता होते. मात्र, आज रायगडमधील तीन समुद्राकिनाऱयांवर 8 जण मृतदेह सापडले तर वलसाड समुद्रकिनारी 2 मृतदेह सापडले. हे सर्व बार्ज आणि वरप्रदा बोटीतील कर्मचारी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. नौदलाकडून स्कॅन रडार आणि प्रशिक्षित पाणबुडय़ांकडून रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवण्यात येत आहे.