
बीड जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 25 मेपर्यंत दहा दिवसांचे कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. या निर्बंधाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याने आणखी सात दिवसांचे म्हणजे 31 मेपर्यंत पूर्वीचेच कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून किराणा व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात 25 मे ते 31 मेच्या मध्यरात्रीपर्यंत नविन निर्बंध जारी केले आहेत. पहिल्या दहा दिवसाच्या कडक लॉकडाऊनमध्ये कोणताही बदल न करता पुढचे उर्वरित सात दिवस कडक निर्बंध जारी केले आहेत. यामध्ये थोडाफार बदल करण्यात आला आहे. दूध विक्रेत्यांना 7 ते 10 पर्यंत विक्रीसाठी मुदत देण्यात आली आहे. भाजीपाला विक्रीस केवळ हातगाडीवरून 7 ते 9 पर्यंत परवानगी राहिल. 10 ते 1 पर्यंत बँकेचे कामकाज मर्यादित वेळेत राहिल.
शासकीय कार्यालय नियमित वेळेनुसार सुरू राहतील. खते, औषधे विक्रीस आणि खरेदीस 7 ते 1 पर्यंत परवानगी देण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानातील माल विक्रीस 7 ते 1 पर्यंत मर्यादा देण्यात आली. बीड जिल्ह्यातील दारूचे दुकाने पूर्णवेळ बंद राहणार आहेत. बाकी इतर सर्व दुकाने सात दिवस कायम बंद राहणार आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जारी केले आहेत.
























































