लेख – वादळांच्या लाटा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी  

मे महिन्याच्या भरउन्हाळय़ात देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर तौकते वादळाने थैमान घातले. केरळपासून वेरावळपर्यंत संपूर्ण पश्चिम किनारा या वादळाने झोडपून काढला. महाराष्ट्रात ते जमिनीवर न येता समुद्रातूनच उत्तरेकडे पसार झाले तरी त्याचा विस्तार नुसत्या स्पर्शाने कहर करणारा होता. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्हय़ांना तडाखा बसला आणि राजधानी मुंबईलाही गेल्या कित्येक वर्षांत अनुभवला नव्हता असा तुफानी वाऱयांचा भयप्रद अनुभव मिळाला. सरकारने सावधगिरी बाळगून उपाययोजना केली तरी अशा वादळांची तीव्रता नुकसान करून जातेच. गेल्या वर्षी निसर्ग, त्याआधी ‘वायु’ अशी वादळांची मालिकाच लागलेली दिसते.

फयान, फणी अशी वादळं देशाच्या पूर्व किनाऱ्यावर धडकून गेली तेव्हा ओडिशा, बिहार, बंगाल यांचे किनारे उद्ध्वस्त झाले होते. एका वादळाने सागरी लाटांचा उद्रेक नव्हे तर वादळांच्याच लाटांमागून लाटा येऊ घातल्या आहेत. आता ‘यास’ नावाचे वादळ ओडिशात येतंय म्हणे. गेल्या दशकात एकूणच निसर्ग बेफाम होऊ लागला आहे. कुठे रौद्ररूप दाखवणारी चक्रीवादळं, कुठे त्सुनामी तर कुठे अवकाळी पावसाचा फटका अशी पूर्वी कधी न पाहिलेली रूपं निसर्ग दाखवतोय. या सर्वांचा परिणाम एकच घडतो. नुकसान. कधी मालमत्ता आणि कधी जीवितहानीही होते. क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याने घरं अक्षरशः उघडी पडतात.

आपल्या उष्ण कटिबंधातील वादळांना तेरा देश नावे देतात. तौकते (क सायलेन्ट) हे नाव म्यानमारने दिलं. हे असं सारखं सारखं का घडतंय? (किंवा बिघडतंय?) याबाबत बोलताना जागतिक हवामानाचे अभ्यासक प्रदीप नायक म्हणतात, ‘जागतिक हवामान बदलाविषयी गेली अनेक वर्षे तज्ञ मंडळी याबाबतचे इशारे कळकळीने देत होती. अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल् गोर मुळात पर्यावरणवादी. त्यांना त्यासाठीचं नोबेलही मिळालं. ग्रेटा थनबर्गही हेच सांगतेय. ‘द इन्कव्हिनियन्ट टथ’ या गोर यांच्या माहितीपटात वातावरण बदलाची दारुण कथा सांकेतिक पद्धतीने मांडली आहे. हा सगळा परिणाम वातावरणातील प्रचंड प्रमाणावर वाढलेल्या कार्बन डायॉक्साईडचा आहे.

शंभर वर्षांपूर्वी 0.025 टक्के एवढा हा वायू वातावरणात होता. आता तो 0.32 आहे. ही वाढ विशेष नाही असं कोणालाही वाटेल. पण या कार्बन डायॉक्साइडचे प्राचीन चक्र मोठय़ा प्रमाणावरील इंधन-ज्वलनामुळे पार बिघडलेले आहे. त्यातच जंगलतोडही मोठय़ा प्रमाणावर होतेय. या सगळय़ाचा एकत्रित दुष्परिणाम पृथ्वीवरचं एकूणच स्वच्छ, शुद्ध वातावरण नष्ट करतोय. त्यातूनच अशी अनपेक्षित चक्रीवादळे, समुद्राची पातळी वाढणं, अंटार्क्टिकाचे हिमखंड तुटणं या सगळय़ा संकटांची मालिका सुरू झाली आहे. आपल्या हिमालयातील ग्लेशिअरची (हिमनद्या) रेषा मागे चालली आहे. हे सारं भयावह आहे. आपण म्हणजे माणसांचं जग वेळीच जागं झालं नाही तर पुढच्या पिढय़ांसाठी आपण नष्टचर्य निर्माण करत आहोत असं म्हणावं लागेल.’

हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावर वादळं येणे ही तशी नवी गोष्ट नाही. पश्चिमेकडे मात्र वीस-पंचवीस वर्षांत एखादा चक्रीवात यायचा. आता त्याचं ‘वार्षिक’ आगमन होऊ लागलं की काय अशी धास्ती निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. देशाचा सुमारे सात हजार किलोमीटरचा सागर तट (आणि महाराष्ट्राचा सुमारे सातशे किलोमीटरचा समुद्रकिनारा) म्हणजे देशाच्या तीन बाजूंनी प्रचंड जलसाठा आहे. उद्या ग्लोबल वॉर्मिंग’ने समुद्राची पातळी वाढू लागली किंवा हिमालयातलं बर्फ वितळू लागलं तर काय होईल! किनारपट्टीच्या वस्त्या, शहरं पाण्याखाली जातीलच, पण हिमालय कोरडा पडला तर उत्तर हिंदुस्थानातील मोठय़ा नद्याही शुष्क होतील.

हे सगळं अर्थातच लगेच घडणार नाही. तसं ते घडत नाही म्हणूनच त्याची तीव्रता कोणाला जाणवत नाही. पृथ्वीवरच्या कार्बन वाढीबद्दल देशादेशात एकमत होत नाही. ‘वसुंधरा’ परिषदा होतात, पण ठोस उपाययोजना करताना संपन्न देशही कच खातात. त्यानी केवळ विकसनशील देशांना उपदेश करून भागणार नाही. केवळ सरकारच नव्हे तर जगातील सामान्य माणसांचंही पर्यावरण-प्रबोधन होणं गरजेचं आहे. त्याविषयी वाचून, ऐकून किंवा केवळ ‘अरे बापरे, हे असं आहे वाटतं’ म्हणून विचार करणे सोडून दिलं तर आपल्याच पुढच्या पिढय़ांना काय सहन करावं लागेल त्याचा विचार आज करायला हवा.

क्वचित येणाऱ्या वादळांचं ‘रुटीन’ होत असेल तर ती धोक्याची घंटा आहे. गेल्या आणि या वर्षी तर ‘कोविड’ने जग हैराण झालेलं असतानाच निसर्गाच्या प्रकोपाचा भयचकित करणारा अनुभव येतोय. पूर्वी कोणी काळजी का घेतली नाही याविषयी विचार करण्याची वेळ निघून गेलीय. आता उद्याचा विचार आजच करावा लागेल. वादळवारे ते अप्रत्यक्षपणे तेच सांगतायत. पण लक्षात कोण घेतो? असं झालं तर कठीणय !

[email protected]