जागतिक रोबोटिक्स स्पर्धेत आयआयटी मुंबई नंबर वन; एरियल रोबोंच्या सहाय्याने अवजड वस्तूंची अदलाबदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई येथील आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांची टीम रोबोटिक्स तंत्रज्ञानामध्ये जगामध्ये अव्वल ठरली आहे. आयआयटी मुंबईच्या टीमने ‘सिम्युलेशन चॅलेंज 2020’ या आंतरराष्ट्रीय एरियल रोबोटिक्स स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. ही जगातील सर्वात प्रतिष्ठेची रोबोटिक्स स्पर्धा समजली जाते.

आयआयटी मुंबईच्या उन्मेष मशरुवाला इनोव्हेशन सेलमधील या टीमचे नाव आहे ‘एईरोवे.’ अत्यंत अवघड आणि अशक्य वाटणाऱया मोहिमेमध्ये एरियल रोबोंची मदत मोलाची ठरते. हे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित व्हावे, विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून नवनवीन एरियल रोबोंची निर्मिती व्हावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा जागतिक पातळीवर आयोजित केली जाते, असे या सेलचे समन्वयक हर्षल कटारिया सांगतात. आयआयटी मुंबईच्या टीमने ही स्पर्धा जिंकायचीच असे लक्ष्य ठेवून त्यात सहभाग घेतला होता, असे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत आयआयटीच्या टीमला अवघड असे लक्ष्य देण्यात आले होते. 9 मिनिटांमध्ये त्यांना दोन अवजड वस्तूंची अदलाबदल एरियल रोबोंच्या सहाय्याने करायची होती. त्यामध्ये टीम यशस्वी झाली. आयआयटी मुंबईने ‘ट्विटर’वरून याची माहिती दिली आहे.