
टूलकिट वादाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सोमवारी ट्विटर इंडियाच्या दोन कार्यालयांवर धाडी टाकल्या. त्यामुळे केंद्र सरकारविरुद्ध ट्विटरचा पारा चढला असून कंपनीच्या अमेरिकेतील मुख्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे प्रकरण आता बायडेन सरकारपर्यंत नेण्याची तयारी ट्विटर मुख्यालयाने केली आहे. त्यामुळे टूलकिट वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसविरोधात भाजप प्रवत्ते संबित पात्रा यांनी केलेल्या पोस्टवर ट्विटरने ‘मॅनिप्युलेटेड मीडिया’चा (फेरफार केलेला मजकूर) शेरा मारला. ट्विटरच्या या कारवाईमुळे भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारने ट्विटरविरोधात भूमिका घेतली. याचदरम्यान दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणाच्या चौकशीचे निमित्त पुढे करीत ट्विटरच्या दिल्ली आणि गुडगाव येथील कार्यालयांवर धाडी टाकल्या. पोलिसांनी हे छापे नियमित चौकशीचा भाग असल्याची सारवासारव केली. मात्र भाजप नेत्यांच्या पोस्टवरील कारवाईनंतरच पोलिसांनी धाडी टाकल्यामुळे ट्विटरने चौकशीवर आक्षेप घेतला आहे. पो
लिसांच्या छाप्याची गंभीर दखल घेत ट्विटरने हे प्रकरण आपल्या कंपनीचे ग्लोबल डेप्युटी जनरल कॉन्सिल आणि कायदेशीर विभागाचे उपाध्यक्ष जिम बेकर यांच्याकडे सोपवले आहे. बेकर यांनी याआधी एफबीआयमध्ये काम केले आहे. तसेच ट्विटरकडून लवकरच बायडेन सरकारकडे दाद मागितली जाणार आहे. कोरोना संकटामुळे सध्या ट्विटर इंडियाचे कार्यालय बंद आहे. मात्र अमेरिकेतील ट्विटरचे मुख्यालय हिंदुस्थानातील कर्मचाऱ्यांशी सतत संपर्कात आहे.
आम्हाला सत्य जाणून घ्यायचेय – दिल्ली पोलीस
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलमार्फत टूलकिट आणि मॅनिप्युलेटेड मीडिया प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आम्ही ज्या तक्रारीची चौकशी करीत आहोत, त्यात आम्हाला ट्विटरचे स्पष्टीकरण हवे आहे. ट्विटरकडे काही माहिती आहे, ज्या गोष्टी आम्हाला ठाऊक नाहीत. ट्विटर त्या माहितीला क्लासिफाईड म्हणत असेल. परंतु आम्हाला चौकशीसाठी ती माहिती गरजेची आहे. आम्हाला सत्य जाणून घ्यायचे आहे, असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.























































