
कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन वेळीच उपलब्ध होणे हे फार महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्ण घरी असताना त्याची ऑक्सिजन पातळीही कमी-जास्त होत असते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याची ऑक्सिजन पातळी नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. यासाठी कोरोना रुग्णांना वेळीच ऑक्सिजन उपलब्ध व्हावे यासाठी वर्सोव्यात ‘ऑक्सिजन बँक’ ही अनोखी संकल्पना राबविली जात आहे.
परिवहनमंत्री व विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे वर्सोवा विधानसभा संघटक व माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांनी आतापर्यंत 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन मोफत उपलब्ध करून दिले आहे आहेत. शिवसेनाप्रणीत महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे वांद्रे ते जोगेश्वरीत सुमारे 2000 सदस्य आहेत. त्यांना काल शैलेश फणसे यांच्या आझाद नगर येथील कार्यालयात युनियनचे सहचिटणीस प्रशांत घोलप आणि विश्वास तेली, कृष्णा ठोंबरे, प्रफुल भगत यांच्या टीमकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन मोफत दिले.
वर्सोवा विधानसभेतील प्रभाग क्रमांक 58, 60, 63 तसेच मिल्लत नगर फेडरेशन, वेसावे येथील सामाजिक सन्मान संस्था, यारी रोड मुस्लिम समाज, आझाद नगर उत्सव समिती, लोकांची शक्ती अशा विविध संस्थांना आतापर्यत 10 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन मोफत दिले आहे. अजून 15 सदर मशीनचे वाटप करण्यात येणार आहे.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन कसे ऑपरेट करायचे याचे प्रशिक्षण वाटप करण्यापूर्वी दिले जाते. सदर ऑक्सिजन बँकेची संकल्पना राबवण्यासाठी शिवसैनिक व युवासेना यांची 24 जणांची टीम कार्यरत आहे. कोविड रुग्णांना वेळीच ऑक्सिजन मिळाल्याने हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करेपर्यंत त्यांची खाली येणारी ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहील असा विश्वास फणसे यांनी व्यक्त केला.


























































