
>> प्रशांत गौतम
मराठवाडय़ात शास्त्रीय नृत्याचा प्रसार करण्यात मीरा पाऊसकर यांचे लक्षणीय योगदान राहिले. या प्रवासासोबतच पाऊसकर यांनी भरतनाटय़म्, कुचिपुडी व लोकसंगीत अशा महत्त्वपूर्ण कलाप्रकारांची त्यांनी जगभरात ओळख निर्माण करून दिली. मीराताईंच्या निधनाने सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. भरतनाटय़मचे शिक्षण देऊन त्यांनी निष्णात शिष्यवर्ग, कलावंत यांच्या जडणघडणीतहीं लक्षणीय योगदान दिले.
संभाजीनगरातील उस्मानपुरा भागातील जयनगर भागात त्यांचा साईदीप नावाचा बंगला आहे. ती वास्तू मीराताईंच्या प्रवासाची साक्ष आहे. मीराताईंच्या पद्न्यासाचा नृत्यझंकार साईदीपमध्ये आता विसावत आहे. श्रीमाता निर्मला देवी नृत्यझंकार अकादमीच्या गुरू असलेल्या मीराताईंचा जन्म कर्नाटकातील धारवाडचा. नृत्यकलेचे शिक्षण त्यांना गुरू श्रीनिवास कुलकर्णी व उमेश हेरेंजळ यांच्याकडून लाभले. समाजशास्त्रात एम.ए. त्यांनी केले. तसेच नृत्यविशारद या महत्त्वाच्या पदवीनंतर त्यांनी संगीत, नृत्य यातही एम.ए.ची पदवी संपादन केली.
संगीत-प्रभाकरही त्या होत्या. या गुणविशेषामुळे त्या 1965 साली धारवाड आकाशवाणी केंद्राच्या मान्यताप्राप्त कलाकार झाल्या. 1977 च्या सुमारास मीराताईंनी श्रीमाता निर्मलादेवी नृत्यझंकार अकादमीची स्थापना केली आणि मराठवाडय़ात नृत्यशिक्षणाचा जोमात प्रचार सुरू झाला. या अकादमीच्या माध्यमातून त्यांनी मराठवाडय़ात प्रथमच भरतनाटय़म्चे शास्त्रोक्त शिक्षण देण्यास प्रारंभ केला. मीराताई संभाजीनगरात येण्यापूर्वी धारवाड आणि हुबळी येथे समाजशास्त्राच्या प्राध्यापक होत्या. त्यांचे पती बँक ऑफ इंडियात कार्यरत होते. त्यांची बदली संभाजीनगरात झाली आणि तेव्हापासून धारवाडच्या मीराताई संभाजीनगरच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या होऊन गेल्या.
भरतनाटय़म्, कुचिपुडी या शास्त्रीय नृत्याच्या त्या अभ्यासक होत्याच, आपल्याला आपल्या गुरूंकडून जे प्राप्त झाले ते ज्ञान त्यांनी आपल्या शिष्यवर्गास दिले. त्यांनी राजीव गांधी बालभवनची संभाजीनगरात शाखा स्थापन केली आणि या शाखेच्या माध्यमातून त्या बालविश्वाशीही जोडल्या गेल्या. कला प्रकार आणि विज्ञान शाखेत विशेष नैपुण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्यासाठीची मोठी संधी दिली. शास्त्रीय नृत्य कलेसाठी पोषक वातावरण नसल्याच्या काळात मीराताईंनी या महत्त्वपूर्ण कला प्रकाराची बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने प्रशिक्षण वर्ग सुरू केले. मीराताईंचा शिष्यवर्ग आज जगभरात पोहोचला आहे.
अनेक मुली अरंगेत्रम्मध्ये चमकल्या. त्यांना पॅरिस, अमेरिका, बेल्जियम, मोरक्क्को, मंगोलिया, चीन, जर्मनी आदी देशांत कलागुण सादर करण्याची संधी मिळाली. मीराताईंचे शिष्य तेथील कलाउत्सवात सहभागी झाले. एवढंच नव्हे तर दूरदर्शनवर त्यांच्या विद्यार्थ्यांना उत्तम सादरीकरण करण्याची संधी मिळाली. संभाजीनगरमधील सिडको भागात त्यांच्या प्रयत्नातून पहिले संगीत विद्यालयाची इमारत उभी राहिली. पहिले संगीत विद्यापीठ त्यांच्याच पुढाकारातून आकाराला आले. सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून त्यांनी आपल्या संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबवले. मुलांमधील सृजनशीलता वाढावी यासाठी अनेक कार्यशाळाही घेतल्या. प्रामुख्याने अशा प्रकारची कार्यशाळा संगीत, नृत्य, लोक व शास्त्रीय संगीत तसेच रेखांकन हस्तकला, संगणक, कराटे, छायाचित्र, मॉडेलिंग आणि क्रिएटिव्ह रायटिंग संबंधित होत्या.
इंडियन डान्स अॅकॅडमीने मीराताईंच्या लक्षणीय योगदानासाठी नृत्य शिरोमणी या पुरास्काराने सन्मानित केले. तसेच त्यांचा ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मान झाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 1993 ते 2010 या काळात त्यांच्या बालभवन संस्थेच्या मुलांना प्रतिष्ठीत बालश्री पुरस्काराने राष्ट्रपती भवनमध्ये सन्मानित करण्यात आले. मीराताई यांच्या कार्याची सर्वदूर नोंद घेण्यात आली. एवढेच नव्हे तर तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, के. आर. नारायणन्, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले. मीराताईंच्या शिष्यवर्गातील एक महत्त्वाची शिष्या तथा मिस इंडिया फेम नवेली देशमुख ही एक होय. तिच्या जडणघडणीत मीराताईंचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला. आपल्या गुरूच्या निधनाबद्दल भावना व्यक्त करताना ती म्हणते, ‘माझ्या प्रवासात त्यांच्या मार्गदर्शनामुळे आधुनिकता आणि हिंदुस्थानी संस्कृती यांचा ताळमेळ साधला.’ मीराताईंच्या निधनामुळे सांस्कृतिक कलाविश्वाचे मोठेच नुकसान झाले आहे.




























































