
दक्षिण मुंबईतील मेट्रो सिनेमानजीक असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकामधील वाहतूक बेटावर महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे ‘ल्युकोफायलम’ ही सुशोभीकरणासाठी उपयोगात येणाऱ्या वनस्पतीची रोपे काही महिन्यांपूर्वी लावण्यात आली होती. या रोपांनी आता चांगलेच बाळसे धरले असून त्यांना आलेली आकर्षक फुले मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत आहेत.
या फुलांचे वैशिष्ट्य म्हणजे या फुलांचा मुख्य बहर हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी येतो. या झाडांना बहर आल्यानंतर काही दिवसातच पावसाला सुरुवात होते, असे सांगितले जाते, त्यामुळे या झाडांना ‘बॅरोमीटर बुश’ या नावानेही जगभरात ओळखले जाते. ही वनस्पती मूलत: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान खात्याद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध चौकांमध्ये आणि रस्त्याच्या दुभाजकांमध्ये पर्यावरणपूरक सुशोभीकरण केले जाते. या अंतर्गत सुशोभीकरणासाठी प्रामुख्याने आकर्षक फुले येणाऱ्या वा आकर्षक पाने असणाऱ्या वनस्पती लावल्या जातात. यानुसार ‘ए’ विभागांतर्गत असणाऱ्या क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौकातील वाहतूक बेटावर ‘ल्यूकोफायलम’ची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांना मार्च ते नोव्हेंबर या काळात फुले येत असली, तरी फुलांचा मोठा बहर हा पावसाळ्यापूर्वी येतो, अशीही माहिती महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.



























































