आठपट जास्त दराने बसविले सीसीटीव्ही, नगर जिल्हा रुग्णालयात 33 लाखांचा घोटाळा उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर, दि. 31 (प्रतिनिधी) – नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना काळातही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने तब्बल 33 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. तत्कालिन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला आहे. अवघ्या चार ते पाच लाख रुपयांना मिळणारी यंत्रसामग्री 8 पट जास्त दराने घेऊन 38 लाख रुपये खर्चून बसविण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी माहितीच्या अधिकारातून उघडकीस आणली आहे.

9 ऑगस्ट 2020 रोजी नाशिकचे आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना हे सीसीटीव्ही बसविण्याची परवानगी दिली. त्यात त्यांनी ही साहित्य खरेदी ‘ई-टेंडरिंग’ करून करावी, असे नमूद केले होते. त्या अगोदर 23 जुलैला टेंडर काढण्यात आले. ई-टेंडरिंग न करता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर ही टेंडर नोटीस फक्त चार दिवस लावण्यात आली होती. त्या काळात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात असल्याने बाहेरचे सीसीटीव्ही बसविणारे ठेकेदार रुग्णालयात जाऊन नोटीस पाहू शकत नव्हते. 29 आणि 30 तारखेला तीन टेंडर प्राप्त झाले. त्यातील माउली एंटरप्रायजेस आणि सिद्धांत एंटरप्रायजेस या दोन्ही ठेकेदार संस्थांचा पत्ता एकच आहे. तिसरा ठेकेदार सॅम कॉम्प्युटर्स यांना तर सीसीटीव्ही विकण्याचा अनुभवदेखील नाही. फक्त नावाला त्यांचे कोटेशन घेण्यात आले आणि सिद्धांत एंटरप्रायजेसला 38 लाख 30 हजार 91 रुपयांचे काम देण्यात आले. 1 जुलैला त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर नाशिक उपसंचालकांना हे दरपत्रक मंजुरीसाठी पाठविण्यात आले. या प्रस्तावाला मंजुरी देताना विभागीय उपसंचालकांनी हे खरेदी ‘जेम’ पोर्टलवर ई-टेंडरिंग करूनच करावी, असे नमूद करण्यात आले होते.

ठेकेदार व अधिकाऱ्य़ांनी तब्बल 33 लाख रुपयांचा घोटाळा केला आहे. यात कर्मचाऱ्य़ांचाही समावेश आहे. त्यामुळे सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी उपजिल्हाप्रमुख जाधव यांनी केली आहे.

ई-टेंडरिंग न करता कोटेशन मागवून वर्क ऑर्डर

 सरकारी नियमाप्रमाणे इतकी मोठी रक्कम खर्ची होत असल्याने शासनाच्या ‘जेम’ या पोर्टलवर अधिकृत ई-टेंडरिंग करून त्या पोर्टलवरूनच या साहित्याची खरेदी होणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता फक्त ठेकेदाराकडून तीन वेगवेगळी कोटेशन घेऊन ही यंत्रणा बसविण्याची वर्क ऑर्डर काढण्यात आली. कोरोनाच्या काळात दुकाने बंद असल्याने या वस्तू चढय़ा भावाने मिळत असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हे ई-टेंडरिंग न करता कोटेशन मागवून काम देण्याची सूट या अधिकाऱ्य़ांनी दिली. तशी तरतूद त्यांनी कराराच्या अटी-शर्तींमध्ये आधीच करून ठेवली.